पंकज राऊत , बोईसर‘कोसळलेल्या खांबाकडे तीन वर्षे दुर्लक्ष मुख्य रस्त्यावर अंधार’ या शीर्षकाखाली मागील महिन्यांत लोकमत मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणची यंत्रणा कुंभकर्ण निद्रेतून जागी झाली. बोईसर-तारापूर या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावरील कोसळलेल्या खांबांच्या जागी सहा नवे खांब तिने उभारले असून लवकरच हा रस्ता झळाळणार आहे. बोईसर रेल्वे स्थानक ते चित्रालय या मुख्य रस्त्यावरील तीन वर्षापासून एका कोसळलेल्या खांबामुळे सलग पाच खाम्बा वरील वीज पुरवठा खंडित होऊन रात्री पादचाऱ्यांना रस्त्यावरुन ठेचकाळत चालावे लागत होते तर मागील २९ महिन्यांपासून खांब बदलण्या साठीचा प्रस्ताव महावितरणच्या पालघर येथील कार्यालयात धूळ खात होता. ती धूळ लोकमतच्या वृत्ताने झटकली गेली. १४ आॅगस्ट २०१४ ला ग्रामपंचायतीने बोईसरच्या एमएसईडीच्या कार्यालयाला कोसळलेला खांब बदलण्या संदर्भात कळविल्यानंतर तसा प्रस्ताव कनिष्ठ अभियंत्यानी ५ सप्टेंबर २०१४ कार्यकारी अभियंता पालघर यांच्याकडे मंजूरी करीता पाठविला. मात्र ग्रामपंचायतीसह व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आणि पाठ पुराव्या अभावी तीन वर्षे वाहन चालकाना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. आता नव्या खांबांवरून तार ही खेचण्यात आली आहे. आता लवकरच त्यावर ग्रामपंचायतीतर्फे एलइडीचे लाइट बसविण्यात येणार आहे.
नवे खांब उभारले, मुख्य रस्ता झळाळणार
By admin | Published: March 16, 2017 2:42 AM