पालघर : काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावितांनी सोमवार केळवा येथे शितलाई देवीचे दर्शन घेत आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली तर सेनेचे उमेदवार अमीत घोडा यांनी कोलवडे, तारापुर इ. २५ गावांचा झंझावाती दौरा केला असताना बविआच्या उमेदवार मनिषा निमकर यांच्यासह आ. हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील इ. नी पालघरमध्ये तळ ठोकून सर्व सामान्यांची समस्यांची माहिती घेऊन विकासासाठी बविआला मतदान करण्याचे आवाहन केले.१३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित तसेच बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनिषा निमकर अशा दोन अनुभवी व कसलेल्या उमेदवाराविरोधात काहीसे नवखे असणारे उमेदवार अमीत घोडा यांना लढत द्यावी लागणार आहे. आपले दिवंगत वडील कृष्णा घोडा यांचा राजकीय वारसा लाभल्यानंतर गावोगावी व किनारपट्टीवर भक्कमपणे उभे राहीलेले सेनेचे संघटन ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. ही पार्श्वभूमी असतांच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उपनेते अनंत तरे यांचे बारीक लक्ष या निवडणुकीवर आहे. सोमवारी अमीत घोडा यांनी कोलवडे, मुरबे, पाम, परनाळी, कुडण, दांडी इ. २५ गावांचा दौरा केला.बविआच्या निमकर या तीन वेळा सेनेच्या आमदार राहील्या असून राज्यमंत्री पदही त्यांनी उपभोगले आहे. २००९ मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर सन २०१४ मध्ये त्यांनी सेनेतून बविआत प्रवेश घेतला आहे. प्रशासनावरील धाक ही त्यांची स्वतंत्र ओळख असली तरी ग्रामीण भागातील आदिवासी समाजाच्या समस्या, आरोग्य, घरकुले इ. प्रश्न हाती घेताना सुर्याचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे व वाढवण बंदराला ठामपणे विरोध हे आपले प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वसई-विरार महानगरपालिकेमध्ये एकहाती सत्ता जिंकल्यानंतर पालघर विधानसभेची निवडणुक जिंकण्यासाठी आ. हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील, नारायण मानकर इ. नी पालघरमध्ये तळ ठोकला असून वसई-विरार प्रमाणे पालघरमध्येही विकास करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
नवख्या व अनुभवींमध्ये रंगणार लढत
By admin | Published: February 02, 2016 1:44 AM