वसई :-नुकतीच राज्य शासनाने मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या नव्या पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्याचे आदेश देत याठिकाणी नवे पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांची नियुक्ती देखील केली. त्यामुळे लागलीच घोषणा होताच नूतन पोलीस आयुक्तांनी प्रथम मीरा भाईंदरला भेट दिली व शुक्रवारी वसई शहराला भेट दिली.
या भेटीत वसई-विरार शहरात पाच अन्य नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश नवनियुक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिले आहेत. दरम्यान शुक्रवारी डॉ. दाते यांनी वसईच्या वसंत नगरी येथील अप्पर पोलीस अधीक्षक या कार्यालयाला भेट देऊन त्याठिकाणी आपल्या कामकाजाचा आढावा घेतला.
वसई विरार आणि मीरा भाईंदर शहराचे मिळून नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. या प्रस्तावित आयुक्तालयाचे पाहिले आयुक्त म्हणून डॉ. सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. दाते यांनी शुक्रवारी वसईत भेट दिली.
शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. या भेटी वेळी डॉ. दाते यांना विचारले असता त्यांनी ही केवळ भेट होती तर पोलीस आयुक्तलय याविषयी बोलणं टाळून लवकरच आम्ही याविषयी माध्यमाशी बोलू असे ही जाताजाता डॉ.दाते यांनी स्पष्ट केलं. वसई विरार शहरात सध्या वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा सागरी आणि तुळींज असे सात पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. त्यात आता आयुक्तालय निर्मितीमुळे या सर्व पोलीस ठाण्याचं विभाजन करून अतिरिक्त 5 नव्या पोलीस ठाण्याच्या निर्मितीची भर केली जाणार आहे. विशेषतः या पोलीस ठाण्यांची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देखील शुक्रवार च्या वसई भेटीत डॉ.दाते यांनी वसई अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना दिले. या नवीन आयुक्तालयात अनुक्रमे पूर्वेतील पेल्हार, मांडवी, आणि पश्चिमेतील आचोळे,बोळींज, नायगांव अशी पाच नवीन पोलीस ठाणी प्रस्तावित आहेत. तर मीरा-भाईंदर शहरात मीरारोड, काशिमिरा, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तन अशी सहा पोलीस ठाणी आहेत. त्यात काशीगांव आणि खारीगांव या दोन नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे.
नवीन पोलीस आयुक्तालयासाठी सध्या जागेचा शोध सुरू; पण मुख्यालय मीरा भाईंदर मध्ये होणार!
खरं तर सप्टेंबर-2019 मध्ये राज्यशासनाने पोलीस आयुक्तांलयाची घोषणा केली होती मात्र त्यानंतर ते कुठं होणार हा वाद रंगलाही होता, वसईतच होणार असे आमदार हितेंद्र ठाकूर म्हणत होते तर तिथे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी त्याचवेळी मीरा भाईंदर पालिकेची भांडार घर जागेचा हट्ट केला होता. तरीही मीरा भाईंदरच्या उजवे वसईत सनसिटी येथे खास पोलीस मुख्यालय साठी 15 एकरहून अधिक जागा आरक्षित आहे. त्यामुळे सध्या तरी जागा शोधण्यासाठी नवे पोलीस आयुक्त दौरा करीत असले तरी पोलीस आयुक्तलय हे मीरा भाईंदर शहरातच होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे.