लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून ५७ लाख ५० हजारांचे मेफेड्रोन, कोकेन असे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
गुरुवारी तुळींजचे पोलीस अंमलदार पांडुरंग सगळे यांना माहिती मिळाली की, प्रगती नगरच्या जगन्नाथ अपार्टमेंट या इमारतीमध्ये एक नायजेरियन अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. सदरबाबत तुळींज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडून कारवाई करणेबाबत आदेश प्राप्त केला. तुळींजचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचून नायजेरियन आरोपी इझे आना (४४) याला ताब्यात घेतले.
घराची झडती घेतल्यावर १३ लाख ३० हजार रूपये किंमतीचे १३३ ग्रॅम वजनाचे कोकेन आणि ४४ लाख २० हजार रुपये किंमतीचे ४४२ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन अंमली पदार्थ मिळून आला आहे. तसेच मोबाईल, रोख रक्कम, इलेक्ट्रिक वजन काटा, पिशव्या असा एकूण ५७ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुळींज पोलिसांनी एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जप्त मुद्देमाल कोठुन खरेदी केला याबाबत आरोपीकडे चौकशी करत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार बाळू बांदल, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, इस्माईल छपरीबन, राहुल कदम, सगळे, राजगे, बागुल, अमोल बर्डे यांनी केली आहे.