- मंगेश कराळेनालासोपारा : नालासोपारा शहरात पूर्व आणि पश्चिम विभागातील दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोकांचा जणू अड्डाच बनला आहे. तुळींज आणि नालासोपारा पोलीस स्टेशन अंतर्गत अंदाजे २ ते ३ हजार नायजेरियन लोक राहत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. पोलीस प्रशासन यांच्यावर वेळीच कारवाई करत नसल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. जर वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर उद्या हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील. बुधवारीच दीड कोटींच्या कोकेनसह एका नायजेरयिनला शहरातून अटक करण्यात आली.काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने वसईमधून एका नायजेरियनला पकडले होते. त्यांच्या गँगही नालासोपारा शहरात कार्यरत असून हे फसवणूक, लॉटरी लागली असल्याची स्कीम, करोडो रुपयांचे बक्षीस लागले, अमली पदार्थ विकण्याचे असे अनेक गैरधंदे बिनधास्त करतात. आठवड्यापूर्वी एलसीबीने ५७ वर्षीय नायजेरियनला ३२ ग्रॅम कोकेनसह पकडले होते. तर दोन दिवसांपासून मेहनत आणि सापळा रचून दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी आजपर्यंत शहरातील अमली पदार्थांच्या विरोधातील मोठी कारवाई करत बुधवारी दुपारी दीड कोटींच्या कोकेनसह ३० वर्षीय नायजेरियनला पकडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवरून अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीमध्ये नायजेरियन नागरिकांचा सहभाग आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.नालासोपारा शहरात या वर्षी अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या चार नायजेरियनवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. तर तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये एका महिलेचा विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.पूर्वेकडील परिसरातील प्रगती नगर परिसरात नायजेरियन लोक अनधिकृतपणे बार चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सदर ठिकाणी ३१ जानेवारी २०१९ ला छापा घालून ५ महिला व २ पुरुष यांच्यासह सात नायजेरियनला अटक करण्यात आली होती.नालासोपारा शहरात पूर्वेकडील आचोळे गांव, अलकापुरी, मोरेगांव, ओस्तवाल नगर, प्रगती नगर, रेहमत नगर तर पश्चिमेकडील हनुमान नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियनची वस्ती आढळते. तर तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात बोटावर मोजण्याइतक्याच नायजेरियची नोंद आहे.कारवाई करण्यासाठी तांत्रिक अडचणी...काही नायजेरियन भारतात राहण्यासाठी अमली पदार्थाच्या केस करवून घेत असल्याचे अनेकदा बोलले जाते. यांना भारतात राहण्यासाठी मज्जाव केला तर काही तांत्रिक अडचणींना पोलिसांना सामोरे जावे लागते. घरे भाड्याने घेणारे नायजेरियन लोकांना दिसतात. पण त्याच घरातील अनेक नायजेरियन लोकांना आणि पोलिसांना दिसत नाहीत.काही नायजेरियनने केले भारतीय महिलांशी विवाह....शहरात राहण्यासाठी काही नायजेरियनने अनोखी शक्कल लढवत आर्थिक व्यवहार करून काही भारतीय महिलांशी लग्न केले आहे.तर काहींनी फक्त नावाला लग्न करून कागदोपत्री या ठिकाणी राहत असल्याचा पुरावा गोळा केला आहे.अमली पदार्थांच्या मुंबईमधील अनेक पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तेथून सुटले की ते नालासोपारा शहरात येऊन आपले बस्तान मांडत आहेत.घरे देणाऱ्या मालक आणि एजंटवर कारवाई करणे गरजेचेकाही परिसरातील घर मालक नायजेरियन लोकांना मोठ्या रकमेमुळे घर भाड्याने देत आहे तर एजंट त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.सामान्य नागरिकांकडून मिळणा-या घरभाड्यापेक्षा जास्त रक्कम आणि वर्षभराचे एकत्र पैसे मिळत असल्याने बिनधास्तपणे काही घरमालक यांना घरे देतात. पोलिसांनी या घरमालक आणि एजंटवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.नायजेरियन नागरिक रहात आहेत त्यांची नोंदणी करून त्यांचे रेकॉर्ड बनवणार. कोण कोण या ठिकाणी राहत आहे तर कोण बाहेरून राहण्यास आले आहेत यांचीही माहिती गोळा करणार आहे. १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करणार असून भविष्यात काही गुन्हेगारी करू नये म्हणून बॉण्ड बनवून घेणार. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पुन्हा गुन्हे दाखल झाले तर त्यांच्यावर तडीपारची कारवाई नक्की करणार. - प्रशांत परदेशी (पोलीस उपविभागीय अधिकारी, नालासोपारा विभाग)पोलिसांनी वेळीच या बाबीकडे लक्ष घातले नाही तर नक्कीच स्थानिकांना आणि पोलिसांना डोकेदुखी ठरणार आहे. या नायजेरियन लोकांना घरे देणाºयावर आणि इस्टेट एजंटवर कडक कारवाई केली पाहिजे. नालासोपारा शहरात यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.- मयूर सकपाळ, स्थानिक रहिवाशी
नालासोपारा नायजेरियनचा अड्डा; अमली पदार्थांची तस्करी, विक्रीत सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 1:47 AM