मोखाडा : खोडाळानजीक असलेल्या परशुराम ॲग्रो टुरिझमच्या नावाखाली अवैधरित्या उत्खनन करून मालक पल्लव कृष्णन नागर यांनी रॉयल्टी घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या २ ते ३ वर्षांत नागर यांनी अवैधरित्या ४ हजार ६६८ ब्रास उत्खनन करून शासनाचा २ कोटी ७२ लाखांचा महसूल बुडवला आहे.याबाबत नोटीस देऊन ६ महिन्यांचा कालावधी उलटूनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ॲग्रो टुरिझमच्या ठिकाणी बेकायदेशीररित्या मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. याबाबत मंडल अधिकारी खोडाळा यांनी पंचनामा करून मोखाडा तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. यानंतर ॲग्रो टुरिझम सेंटर प्रा. लि. यांना २ कोटी ७२ लाख ८४ हजार ४६० रुपयांच्या दंडाची नोटीस मोखाडा तहसील कार्यालयाने बजावली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेले नाही. महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने पंचनामा करून दंडाची नोटीस पाठवली आहे, असे परशुराम ॲग्रो टुरिझमचे मालक पल्लव नागर यांनी सांगितले.
ॲग्रो टुरिझम राॅयल्टी घोटाळाप्रकरणी सहा महिन्यांनंतरही कारवाई नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 12:06 AM