लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : महाशिवरात्रीचा सण हा हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जत्रेचेही आयोजन करण्यात येते; पण या वर्षी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने जिल्ह्यातील मंदिरे भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येऊन केवळ पारंपरिक पूजा करण्यात आली. यामुळे ना गर्दी, ना जत्रा, ना बम बम भोलेचा गजर जिल्ह्यात घुमला. दरम्यान, काही मंदिरे कोरोनाचे नियम पाळून खुली ठेवण्यात आली होती.
काही मंदिरांत कोरोनाचे नियम, अटी पाळत शिवभक्तांनी बाहेरून दर्शन घेत महाशिवरात्रीचा उपवास सोडला, तर रेल्वे स्थानक, बस स्थानक, आठवडे बाजार या ठिकाणी गर्दी होत असताना मात्र मंदिर दर्शनासाठी का बंद ठेवण्यात आली, याबाबत भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण होते. वसई तालुक्यात तुंगारेश्वर, गोखिवरे, विरारपाटा, पारोळ, ईश्वरपुरी अशा अनेक ठिकाणी या शिवमंदिरात महाशिवरात्री साजरी केली जाते; पण या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिरांमध्ये या वर्षी पारंपरिक पूजा वगळता इतर उत्सव बंद करण्यात आले. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी ये-जा सुरू केली; पण प्रत्येक मंदिरावर पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांनी दर्शनासाठी प्रवेश नाकारला. त्यामुळे अनेकांनी कळस दर्शन घेतले, तर गोखिवरे शिवमंदिर समितीने ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षी महाशिवरात्री पर्व भक्तांनी घरी साधेपणाने साजरे केले.
काही मंदिरे खुलीया वर्षी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने वसई तालुक्यातील मंदिरांत पारंपरिक पूजा करण्यात आली, मात्र भक्तांच्या दर्शनासाठी काही मंदिरे बंद करण्यात आली, होती तर काही मंदिरांत कोरोनाचे नियम-अटी पाळत शिवभक्तांनी दर्शन घेतले आणि महाशिवरात्रीचा उपवास सोडला. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी ये-जा सुरू केली, पण प्रत्येक मंदिरावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही मंदिरांत कोरोनाचे नियम-अटी पाळत भक्तांनी दर्शन घेतले.
वाड्यातील शिवभक्तांनी घेतले मुखदर्शनnवाडा : तालुक्यात तिळसेश्वर, आंबिस्ते येथील नागनाथ मंदिर, घोडमाळ, कोंढले, नारे आदी ठिकाणी शंकराची मंदिरे असून, महाशिवरात्रीदिवशी यात्रा भरून दर्शनासाठी शिवभक्तांच्या दरवर्षी लांबच लांब रांगा लागत असत, परंतु यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शासनाने यात्रा बंदचे आदेश काढल्याने वाड्यातील शिवभक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून मंदिराच्या आवारात जाऊन मुखदर्शन घेतले. nब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेल्या तिळसेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भरत असलेल्या एकदिवसीय यात्रेसाठी व शिवशंकराच्या चरणी लीन होण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतून भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. यावर्षी मात्र शासनाने निर्बंध लादल्याने तुरळक प्रमाणात भाविक दाखल झाल्याने तिळसेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
बोर्डी आणि झाई समुद्रकिनारी साकारले वाळूशिल्पबोर्डी : महाशिवरात्रीनिमित्त डहाणू तालुक्यातील बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील झाई समुद्रकिनारी महादेवाचे वाळूशिल्प साकारण्यात आली होती. यंदाही भक्तांनी ही परंपरा जोपासली. त्यामध्ये महिलांनाही योगदान दिले.डहाणूतील बोर्डी आणि झाई या समुद्रकिनारी महाशिवरात्रीला महादेवांचे वाळूशिल्प साकारण्याची परंपरा आहे. याकरिता पहाटेपासून नागरिक समुद्रकिनारी दाखल होतात. वाळू गोळा करण्यासाठी बच्चेकंपनी पुढाकार घेतला होता. महादेवाची वेगवेगळ्या आकारांची पिंड, नंदी बनविले होते. त्यानंतर शंख, शिंपले आणि फुलांनी त्याची सजावट केली होती. त्यानंतर महिलांनी या पिंडींचे विधिवत पूजन केले. त्यानंतर बच्चे कंपनींने समुद्रात पोहण्याचा आनंद लुटला. दरवर्षी बोर्डीतील वाळूशिल्पकार भास्कर दमणकर सात ते आठ फूट उंचीचे उभे वाळूशिल्प साकारतात. ते पाहण्यासाठी पर्यटकांची चौपाटीवर गर्दी जमते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी त्यांनी शिल्प न साकारल्याने अनेकांचा हिरमोड झाला.