मीरारोड - माजी भाजपा आमदार यांच्या कंपनीच्या मीरारोडच्या अपना घर फेस ३ ह्या बांधकाम प्रकल्पात आधी २ लहान बालकांचा व नंतर एका व्यक्तीचा पडून मृत्यू झाला. तोच २४ मे रोजी डोक्यावर दगड पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काशिगाव पोलिसांनी कंत्राटदार व सुपरवायझर यांच्यावर केवळ ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला असला तरी विकासकाला आरोपी केले नाही. त्यातच रविवारी उत्तन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुन्ह्यातील आरोपीची भेट माजी आमदाराने घालून दिली . त्याचे छायाचित्र देखील माजी आमदाराने शेअर केले आहे.
भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबियांची सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनी आहे . सदर कंस्ट्रक्शन कंपनीचे मीरारोडच्या विनय नगर भागात आपणा घर फेस ३ च्या गृहसंकुलाचे बांधकाम सुरु आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये अपना घर फेस ३ येथील बांधकाम ठिकाणी लोखंडी अँगल डोक्यावर पडून ४ वर्षांच्या सुभो सुधांशू दास व ६ वर्षांचा जयंत उर्फ जयंतो बच्चन दास ह्या दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी काशीमीरा पोलिसांनी कंत्राटदार महेंद्र कोठारी वर ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला होता.
तर फेब्रुवारी २०२४ मध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्या वरून पडून मुकेश सिंह मार्को ( २६ ) ह्या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला का नाही? हे समोर आलेले नाही.
बांधकाम ठिकाणी निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कडे दुर्लक्ष केल्याने २ दुर्घटना घडून त्यात दोन लहान बालकांचा आणि एका तरुणाचा बळी गेला होता. त्यामुळे विकासकासह संबंधित येथील सुरक्षिततेची काळजी घेतील अशी अपेक्षा होती .
परंतु २४ मे २०२४ रोजी अपना घर फेस ३ येथील बांधकाम प्रकल्पात काम करणारा २२ वर्षीय डबलू ब्रिजलाल यादव ह्या मजुराच्या डोक्यात वरून दगड येऊन पडला . त्यात गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झाला . या प्रकरणात देखील काशिगाव पोलिसांनी कामगाराच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपायोजना राबवली नाही व त्यांच्या सुरक्षे प्रति बाळगलेल्या निष्काळजीपणामुळे डबलू यादव याचा मृत्यू झाल्याचे नमूद करत सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीचा सुपरवायझर व कंत्राटदार वर कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला.
सातत्याने हलगर्जीपणा करत लहान मुलं व मोठे असे चौघांचे बळी गेल्याने तसेच पोलिसांनी ३०४ अ हे जुजबी कलम लावतानाच विकासकाम आरोपी न केल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठत आहे . घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना , पुणे येथील पोर्शे कार अपघात व डोंबिवली येथील स्फोट प्रकरणी कलम ३०४ पासून अनेक कलमे लावून मालक आदींवर गुन्हा दाखल केला गेला असताना मीरारोडच्या ह्या बांधकाम प्रकल्पात सातत्याने दुर्घटना घडून चार जणांचे बळी जाऊन देखील पोलिसांनी कलम ३०४ लावले नाही तसेच विकासक माजी आमदार आदींना आरोपी केले नाही याचा निषेध सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता , जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम आदींनी केला आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम परवानगीत देखील बांधकाम ठिकाणी जीवित हानी होणार नाही याची जबाबदारी विकासक , वास्तू विशारद , स्ट्रक्चरल इंजिनियर , साईट सुपरवायझर यांची राहणार असल्याचे नमूद आहे.
दरम्यान रविवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाईंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. तेथे विकासक तथा माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी दुर्घटना व मृत्यूस कारणीभूत गुन्ह्यातील आरोपी महेंद्र कोठारी याची फडणवीस यांच्या सोबत भेट घालून दिली. ह्या भेटीची छायाचित्रे स्वतः मेहता यांनीच समाजमाध्यमांवर शेअर केली आहेत. त्यामुळे ह्यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.