भार्इंदर : फेब्रुवारी २०१४ मध्ये लोकार्पण झालेल्या पालिकेच्या पहिल्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचा कारभार हाकण्यासाठी अनेकदा निविदा काढल्या. मात्र अद्याप कंत्राटदार न मिळाल्याने अडीच वर्षापासून ते सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे. महासभेतील मंजूर ठरावानुसार प्रशासनाने अनेकदा निविदा काढल्या. परंतु, त्यातील धोरणाशी विसंगत कंत्राटदार मिळाल्यामुळे प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी पुन्हा निविदा काढण्याचा विचार सुरु केला होता. सध्या कंत्राटदाराचा शोध घेणे ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेकडून शहरात खेळाडू घडविण्याचा प्रयत्न हवेत विरला आहे. माजी खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधण्याच्या प्रस्तावाला २० एप्रिल २०११ मध्ये महासभेने मंजुरी दिली. भार्इंदर पूर्वेकडील नागरी सुविधा भूखंडावरील १६ हजार ८०० पैकी पालिकेच्या ताब्यात ११ हजार ७८७ चौरसमीटर जागा आली आहे. या जागेपैकी १५ टक्के म्हणजेच १ हजार ७६८ चौरसमीटर जागेवर ते बांधण्याचे ठरविण्यात आले. त्याचे भूमिपूजन १३ मे २०१२ मध्ये तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. २१ कोटी ३५ लाख खर्चून बांधलेल्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचा लोकार्पण सोहळा २३ फेब्रुवारी २०१४ माजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाला. पहिल्या टप्प्यातील स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी सुमारे ६ कोटी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सुमारे साडेपंधरा कोटींची उधळपट्टी झाल्याचे बोलले जाते. लोकार्पणानंतर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे. ते कंत्राटावर चालविण्यासाठी प्रशासनाकडून कंत्राटदाराची शोधाशोध सुरु झाली. त्याचे धोरण जून २०१५ मधील महासभेत ठरविण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी नवी मुंबई येथील एका क्रीडासंस्थेने पालिकेला स्पोर्टस् कॉम्प्लेक्स चालविण्याबाबत रस असल्याचे कळविले. प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव महासभेतील मंजूर धोरणानुसार विसंगत असल्याने प्रशासनाने तो नाकारला. परंतु, या संस्थेसोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, आता निविदा काढण्याचा विचार सुरु केला. (प्रतिनिधी)
निविदा काढूनही कुणी कंत्राट घेत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2016 1:59 AM