मीरारोड - सागरी मार्ग बांधण्याआधी मच्छीमारांच्या प्रलंबित हक्काच्या मागण्या पूर्ण करा. सागरी मार्ग योजनेची परिपूर्ण माहिती मच्छीमारांना देऊन त्यांना आधी विश्वासात घ्या. मच्छीमारांना डावलून सागरी मार्ग लादाल तर सागरी मार्गाचा एक दगड देखील समुद्रात लावू देणार नाही असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी दिला आहे. वरळी वांद्रे सागरी मार्ग हा अंधेरी व पुढे बोरिवली , मीरा - भाईंदर आणि वसई - विरार पर्यंत प्रस्तावित केला आहे . त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमारां समोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत . सागरी मार्ग समुद्रात बांधला जाणार असल्याने किनाऱ्यावरच्या कोळीवाड्याना मासेमारीच्या बोटी ने - आण करणे अडचणीचे ठरणार आहे . किनाऱ्या जवळ चालणारी मासेमारी बंद होण्याची भीती आहे . आधीच मासळीचा दुष्काळ असताना ह्या कामा मुळे मासेमारी बाधित होणार असल्याचे मच्छीमार सांगतात.
दरम्यान मच्छीमारांना विश्वासात न घेताच एमएमआरडीए ने एका संस्थे मार्फत उत्तन समुद्रात वाशी खडक जवळ सर्वेक्षण सुरु केल्याचे पाहून चौक येथील माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद , गाव जमातीचे अध्यक्ष पास्कल पाटील सह मच्छीमारांनी शुक्रवारी समुद्रात जाऊन सदर सर्वेक्षण बंद पाडले होते . त्या आधी मढ, अर्नाळा येथील मच्छीमारांनी देखील सर्वेक्षणास विरोध केला होता.
समुद्रात सर्वेक्षण सुरु करण्या आधी राज्य शासन , एमएमआरडीए , मत्स्य व्यवसाय विभाग यांनी स्थानिक मच्छीमार संघटना , मच्छीमार संस्था ह्यांना विश्वासात घेऊन संयुक्त बैठक घेणे आवश्यक होते . सागरी मार्ग कसा बांधणार आहेत , कोळीवाड्याच्या ठिकाणी त्याची रचना कशी असेल , सागरी मार्गावरून जोड रस्ते कुठून काढले जाणार आहेत ? , काम किती वर्ष चालेल व त्यामुळे मासेमारी वर प[परिणाम होऊन मच्छीमारांचे होणारे नुकसान आदी गोष्टी मच्छीमारां समोर शासनाने मांडल्या पाहिजेत . मात्र थेट सर्वेक्षणच सुरु केल्याने संताप निर्माण झाल्याचे मच्छीमारांनी बोलून दाखवले .
सागरी मार्गाचे काम सुरु करण्या आधी शासनाने मच्छिमारांच्या न्यायहक्काच्या मागण्या आधी पूर्ण कराव्यात . कोळीवाड्यातील मच्छीमारांची घरे, मासळी सुकवणे, जाळी विणणे, बोटी दुरुस्ती, बर्फ कारखानच्या जागा ह्या मच्छीमारांच्या नावे कराव्यात. प्रत्येक किनाऱ्यावर जेट्टी, पाण्याची व्यवस्था, वीज, मासळी साठवण्या करिता शीतगृह बांधणे इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून द्या . मासेमारीसाठीच्या बर्फ कारखान्यांना विज दरात सवलत द्या. सागरी बंदोबस्त करिता पोलिस सह विविध सुरक्षा संस्थां मध्ये मच्छीमारांच्या मुलांना नोकऱ्या द्या . सागरी जिल्ह्यात सुसज्ज मासळी मार्केट आदी मच्छीमारांच्या मागण्या असल्याचे बर्नड डिमेलो म्हणाले. गेल्या अनेक वर्षां पासून मच्छीमारांना केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले गेल्याने मच्छीमारां मध्ये अविश्वास आणि संताप निर्माण झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले.