- रवींद्र साळवेमोखाडा : मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय शिंदे यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. मात्र त्यांच्या जागी नवीन डॉक्टर अद्यापही न आल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालय बालरोगतज्ज्ञ डॉक्टरविना पोरके झाले आहे. ग्रामीण भागातील गरीब-आदिवासी गरोदर माता तसेच बालकांवर उपचार होण्यात अडचणी येत असल्यामुळे ‘कुणी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर देता का... बालरोगतज्ज्ञ डॉक्टर’ असे संतापून म्हणायची वेळ तालुकावासीयांवर आली आहे.जवळपास दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत मोखाडा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली नसल्याने स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मोखाडा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून २५९ गाव-पाड्यांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेणारे मोखाद्याचे एकमेव ग्रामीण रुग्णालयच असून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर गरोदर मातांचे प्रमाण देखील अधिक असून लहाने बालके तसेच नवजात बालकांवर योग्य उपचारासाठी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आवश्यक आहे.मोखाडा तालुका कुपोषण व बालमृत्यूने पीडित असताना देखील या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून कायमस्वरूपी बालरोगतज्ञ डाक्टरॅ नाही ही बाब गंभीर आहे. यामुळे स्थानिक आमदारांनी आरोग्य मंत्र्यांकडे हा प्रश्न मांडून या ठिकाणी तात्काळ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर किंवा डॉ. दत्तात्रय शिंदे यांची पुन्हा मोखाडा येथे नियुक्ती करायला हवी, असे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आपल्याकडे बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉक्टर आहेत, मात्र काही कारणास्तव सध्या पालघरला त्यांची प्रतिनियुक्ती झाल्याची माहिती मला मिळाली आहे. यानुसार सदरचे डॉक्टर दोन दिवस ग्रामीण रुग्णालय मोखाडा या ठिकाणी उपलब्ध होत असले तरी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ नक्की मिळेल. तसा पाठपुरावा सुरू आहे.- सुनील भुसारा, आमदार,विक्रमगड विधानसभायाबाबत अधिक माहिती घेऊन मोखाडा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी बालरोगतज्ञ डॉक्टर नेमण्याच्या कार्यवाहीसाठी प्रयत्न करू.- कांचन वानरे, सिव्हिल सर्जन, पालघर
रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच नाही! मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 1:11 AM