नालासोपारा : वसई, विरारमधील पाच रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांकडून भरमसाट शुल्कआकारणी केली जात असल्याचे समोर आले आहे. या भरमसाट वसुली करणाऱ्या रुग्णालयांना वसई-विरार शहर महानगरपालिकेने रीतसर नोटिसा बजावून कोरोना रुग्णांकडून जादा शुल्कआकारणी न करता आपत्कालीन परिस्थितीत आरोग्यसेवा प्रदात्यांकडून आकारल्या जाणाºया तक्रारींचे निवारण करण्यासाठी २१ मे २०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेच्या परिशिष्ट-सी नुसार दर आकारण्यात यावे, असा आदेश दिला आहे.
महापालिकेने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा जादा दर रुग्णांकडून आकारल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचाराकरिता महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट (सुधारणा) २००६ अंतर्गत नोंदणीकृत आरोग्यसेवा देणाऱ्यांकडून कोविड-१९ आपत्ती काळ परिस्थितीत जादा रक्कम आकारली जात असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो, अशा तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेने वसई, विरारमधील पाच रुग्णालयांना नोटिसा पाठवून कोविड-१९ रुग्णांकडून भरमसाट शुल्कआकारणी न करता महापालिकेने ठरवून दिल्यानुसारच शुल्कआकारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिद्धी-विनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (नालासोपारा पश्चिम), स्टार हॉस्पिटल (नालासोपारा पश्चिम), विनायक हॉस्पिटल (नालासोपारा पूर्व), गोल्डन पार्क हॉस्पिटल ( वसई पश्चिम) व विजय वल्लभ हॉस्पिटल (विरार पश्चिम) या रुग्णालयांना महापालिकेने सदरची नोटीस पाठवली आहे. दरम्यान, वसईतील कॉर्डिनल ग्रेशिअस रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णाला नातेवाईकांच्या हवाली केल्याची घटना घडल्यानंतर महापालिकेने भरमसाट शुल्कआकारणी करणाºया रुग्णालयांना दणका देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.