नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरार येथे राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावरील पेट्रोल बॅाम्ब हल्ल्यातील कुख्यात गँगस्टर व गोल्डन गॅंगचा मोरक्या चंद्रकांत खोपडे याचा मुलगा शैलेंद्र खोपडे याला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील एकमेव मुख्य आरोपी सनी ठाकूर अद्याप फरार आहे.
आयर्नमॅन हार्दिक पाटीलच्या घरावर पेट्रोलचा बाँम्बचा मारा करण्यात आला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, कट कारस्थान रचणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या गोल्डन गॅंगचा म्होरक्याचा मुलगा शैलेंद्र खोपडे याला मुंबईच्या भोईवाडा परिसरातून विरार पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पकडले आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच शैलेंद्र याच्यावर मुंबईत काही गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही कळते. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलेंद्रने व्हाटसअप कॉलवरून हार्दिक पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तर कांचन ठाकूरला ही याने हार्दिक ठाकुरची हत्या करण्यासाठी पिस्तुल दाखवल्याचे विरार पोलिसांनी वसई न्यायालयाला जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये सांगितले आहे.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावर शैलेंद्र खोपडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शनिवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली.
नेमकी काय होती घटनाविरार येथील वर्तक वार्डच्या स्वागत बंगलो येथे ४ मेच्या रात्री पावणे बाराच्या दरम्यान हा हल्ला झालेला आहे. हिरव्या रंगाच्या यामाहा फसीनो दुचाकीवरून येऊन जाणिवपूर्वक पेट्रोल भरलेल्या काचेच्या बाॅटलमधील कोंबलेल्या कपड्यासं आग लावुन ती पेटती बाॅटल हार्दिक पाटील यांच्या राहत्या बंगल्यामधील गेटच्या आतील भागात फेकून हा हल्ला करण्यात आलेला आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती.