लोकमत न्यूज नेटवर्कविरार : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून त्याअंतर्गत विरारमधील जीवदानीदेवी मंदिरासाठी फनिक्युलर रेल्वे प्रकल्प उभा राहणार आहे. समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी सध्या आबालवृद्धांना पायऱ्या चढाव्या लागतात. पण, आता ही फनिक्युलर रेल्वे झाल्यानंतर भक्तांचा त्रास वाचणार आहे.
जगभरातील काही मोजक्याच पर्यटनस्थळांसाठी फनिक्युलर रेल्वेची सोय आहे. आता पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचाही त्यात समावेश होणार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही रेल्वे लहानग्यांसाठीही चांगलीच आकर्षक ठरणार आहे, असा विश्वास जीवदानीदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला.
जीवदानी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. डोंगरावरील या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना १४०० ते १५०० पायऱ्या चढाव्या लागतात. पण, भाविकांचे कष्ट दूर करण्यासाठी आता जीवदानीदेवी मंदिर ट्रस्टने फनिक्युलर रेल्वे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ३२ ते ३५ कोटी रुपये खर्च येणार असून जीवदानीदेवी मंदिर ट्रस्ट हा खर्च करणार आहे. रेल इंडिया टेक्निकल ॲण्ड इकॉनॉमिक सर्व्हिस या कंपनीने या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून हिरवा कंदील दिला आहे.
येत्या महिनाभरात हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत येईल, असे ट्रस्टच्या राजीव पाटील यांनी स्पष्ट केले. ही रेल्वे एका वेळी १०४ भाविकांना घेऊन जाईल. तासाभरात ही रेल्वे १२ फेऱ्या मारेल. या गाडीच्या डब्यांमध्ये बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी सोय असेल, अशी माहिती श्री जीवदानीदेवी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली.
फनिक्युलर रेल्वे म्हणजे काय?डोंगराळ भागात किंवा एखाद्या कड्यावर केबलच्या साहाय्याने ही रेल्वे चालवली जाते. या रेल्वेच्या डब्यांखाली आऱ्यांसारखी रचना असते. त्यातून ही केबल किंवा चेन टाकलेली असते. ते आरे फिरायला लागल्याने त्या केबलच्या माध्यमातून ही रेल्वे पुढे सरकते. उंच चढाच्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो.