जव्हार : सध्या जव्हार मोखाडा तालुक्यावर पाणीबाणीचे संकट घोंघावत असतांना नुकतेच कोकण प्रदेशांतर्गत वैतरणा उपखोºयाच्या प्रारूप जल आराखड्यावर जनसुनावणी घेण्यात आली. मात्र त्याची कल्पना स्थानिक जनतेला आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली नसल्याने याबाबत तीव्र असंतोष तीमध्येच व्यक्त करण्यता आला. जलसंपदा विभाग, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि ठाणे पाटबंधारे मंडळ यांनी दमणगंगा उपखोरे, वैतरणा उपखोरे तसेच समुद्राला मिळणारे उपखोरे या भागांची जल आराखड्याची सुनावणी नुकतीच मनोर येथे ठेवण्यात आली होती.यामुळे ही सुनावणी आता जव्हार येथे १५ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र त्या अगोदर हा आराखडा नेमका काय आहे याची माहीती जव्हार मोखाडयातील नागरीकांना व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनेश भट जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या मागणी नुसार ७ फेब्रुवारीला ही माहीती जव्हार येथे देण्यात येणार आहे. हा सगळा प्रकार होत असताना महत्वाचा मुद्दा हा आहे कि मोखाडा येथील तुळयाचापाडा धरण, मध्यवैतरणा प्रकल्पातील पळसपाडा धरण, खोच येथील वनराई बंधारा तर जव्हार येथील खडखड धरण, काम सुरू असलेले लेंडी धरण यांचा आजवर या भागाला नेमका काय फायदा झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे कारण जमीनी इथल्या भूमिपुत्रांच्या अधिग्रहीत करायच्या त्यांना कायमचे विस्थापित करायचे अन पाणी मात्र शहरी भागाकडे न्यायचे असाच प्रकार सुरू असल्याने हे तालुके बिनकामी जलाशयाचे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर शासनाकडून या आराखाड्याच्या निमित्ताने पाणी पळविण्याचा प्रयत्न पुन्हा तर होत नाही ना, अशी भीती या भागातील सर्वांना वाटू लागली आहे. कारण की येथील पाण्याचा उपयोग आधी इथल्या सिंचनासाठी व जनतेच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी व्हायला हवा त्यानंतरच पाणी अन्य प्रदेशाला देण्याचा निर्णय झाला पाहिजे. हे पाणी आमच्या हक्काचे असून कुणाच्याही बापाचे नाही अशी हाक येथील नागरिकांनी आता द्यायला हवी कारण असे आराखडे म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे साधनच बनले आहे. त्यामुळेच ते इंग्रजीत करणे त्याला प्रसिद्धी न देणे येथील जनतेला त्याची माहिती न देणे, हरकती आणि सुनावणी याबाबतही अनभिज्ञ ठेवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे त्याची सांद्यंत माहिती घेऊन आपल्या हरकती मांडून त्यात आवश्यक ते बदल करवून घेणे आवश्यक आहेत. अन्यथा आपलेच पाणी आपल्यापासून हिरावले जाईल. अशी सांशंकता आहे. याशिवाय नुसतीच याभागात मोठ मोठी धरणे होत असताना जव्हार भागाला हादरे बसणेही याचाच एक भाग असल्याचा आरोपही होतो आहे.>पाण्यासाठी महिलांचा मोर्चावसई : पिण्याच्या पाण्यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विरारजवळील चंदनसार कातकरी पाड्यातील महिलांनी दुपारी वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. चंदनसार कातकरी पाड्याची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक असून त्याठिकाणी सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीतून अवघ्या चारशे लोकांनाच पाणी पुरवठा केला जातो. या टाकीचा क्षमता १ लाख २० हजार लिटर असतांनाही कातकरी पाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पाणी पुरवठ्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने ह्युमन्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने दुपारी मुख्यालयावर धडक मोर्चा नेला होता. पाणी द्या, पाणी द्या अशी घोषणाबाजी करीत महिलांनी दीड तास ठिय्या दिला होता. शिष्टमंडळाने शहर अभियंत्यांची भेट घेतली असता महासभेत प्रस्ताव आणून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.>आता जागरुक अभ्यास हवा: यामुळे जमीन आमची विस्थापित आम्ही व्हायचे अन पाणी मात्र अन्य भागात हे आता इथली जनता सहन करणारी नाही यामुळे आता या येवू घातलेल्या आराखड्याच्या अभ्यास करून यावर ठोस पाउले उचलणे काळाची गरज आहे.
वैतरणा उपखोरे जलआराखडाप्रकरणी आता सुनावणी १५ फेब्रु.ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:37 AM