पालघर : पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील एका ३० वर्षीय क्ष-किरण तंत्रज्ञाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली असून या तंत्रज्ञाच्या संपर्कात आलेल्या अन्य सुमारे दहा ते बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, आरोग्य सेविका आणि सुमारे ३० रुग्णांचाही समावेश असल्याने घबराट पसरली आहे. संपर्कातील व्यक्तींचे घशांचे नमुने तपासणीस पाठविण्यात आले असून त्यांचे अलगीकरण व विलगीकरण करण्यात येणार आहे.
पालघर व परिसरातील गाव-पाड्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हे समर्पित कोरोना उपचार केंद्र म्हणून कार्यरत करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षकांच्या देखरेखीखाली कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना ठेवण्यात येत होते. त्यांच्यावर उपचार करणाºया व सेवा देणाºया कर्मचारी, नर्स व तंत्रज्ञांना खबरदारी म्हणून पालघर शहरातील लक्ष्मी लॉज येथे राहण्याची सुविधा करण्यात आली होती. ३० वर्षीय तंत्रज्ञामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांची तपासणी केली असता कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या ग्रामीण रुग्णालयातील सुमारे १० ते १२ कर्मचारी व बाह्यरुग्ण विभागांतर्गत रुग्णालयात दाखल सुमारे ३० रुग्णांचे अलगीकरण व विलगीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
रुग्णालयात निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात आली असून रुग्णालयाची सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी सांगितले. कोरोनाबाधित तंत्रज्ञ यांना बोईसर येथील टिमा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तसेच पालघर पूर्व येथील एका औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामाला जाणाºया टेंभोडे येथील गणेशनगरमध्ये राहणाºया एका ४८ वर्षीय कामगारामध्येही कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघर शहरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईहून डहाणूत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
डहाणू : मुंबईहून चार दिवसांपूर्वी डहाणूतील केटीनगर येथे नातेवाइकांकडे आलेल्या ४२ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही महिला आणि तिचा मुलगा २० मे रोजी सांताक्रूझ येथून डहाणूतील केटीनगर येथे पाहुणे म्हणून आले. प्रवासात तिला त्रास झाल्याने डहाणूतील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आले. येथून तिला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे महिलेचा स्वॅब नमुना घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला ज्या कुटुंबाकडे गेली होती, तेथील तिघांना आधीच क्वारंटाइन केले आहे. त्यांचेही स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत.