मीरारोड - महायुती शासनाने मराठा समाजाला ४० दिवसात आरक्षणवर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन सुद्धा शब्द न पाळल्याने मीरा भाईंदर मधील मराठा समाजाने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत १ नोव्हेम्बर पासून साखळी उपोषण सुरु करणार असे जाहीर केले आहे. मीरा भाईंदर सकल मराठा समाजची बैठक रविवारी पार पडली . या बैठकीत यावेळी माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम , माजी शिक्षण समिती समभापती सुरेश दळवी, माजी नगरसेवक अनिल भोसले सह अमोल जाधवराव, सुभाष काशीद, जयराम मेसे ,लक्ष्मण पाटील, रमेश पवार, मनोज राणे, देवदास सावंत, सचिन पोपळे, कृष्णा दरेकर, अनिल ताटे, प्रकाश नागणे, अंकुश मालुसरे, संतोष गोळे, सुहास सावंत, रवींद्र भोसले, गणेश वाडिले , प्रवीण उत्तेकर, निलेश भालेकर, अमोल मोरे, प्रशांत सावंत, विनोद जगताप, विजय निकम आदी बैठकीत सहभागी झाले होते . सर्व राजकीय पक्षां मधील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने शब्द देऊन सुद्धा निर्णय न घेतल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देत व १ नोव्हेम्बर पासून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक , गोल्डन नेस्ट येथे साखळी उपोषण करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला . मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या . राज्यातील मराठा समाज एकवटला असून आता मराठे माघार घेणार नाहीत असा निर्धार यावेळी केला गेला. मराठा समाजाचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही दबावाखाली न येता आरक्षण द्यावे . आरक्षणाबरोबरच सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण तरुणींना लाभ होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले गेले.