लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण बाहेरगावातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यास धजावत नाहीत. गृहविलगीकरणात घरी पुरेशा सुविधा नसल्याने अन्य सदस्यांनाही बाधा पोहोचण्याचा धोका वाढतो. याकरिता डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात, जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्राम विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याचे आदेश डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले आहेत. तसे आदेश ग्रामपंचायतींना प्राप्त झाले असून, त्याच्या अंमलबजावणीला लवकरच प्रारंभ होणार आहे.डहाणू तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील रुग्णांकरिता ग्राम विलगीकरण कक्षाची स्थापना करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कोविडसदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण केले जाणार आहे. त्यानुसार डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतीअंतर्गत त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे आदेश काढले आहेत. त्याबाबत तत्काळ नियोजन करण्याची कार्यवाही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना करण्याचे सांगितले आहे. याकरिता कोविड-१९ सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीचा अध्यक्ष सरपंच असून, ग्रामसेवक हा सदस्य सचिव आहे. तलाठी, पोलीसपाटील, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यसेवक व आशा कर्मचारी हे सदस्य आहेत.या समितीवर गावातील कोविड लक्षण आढळणाऱ्यांना घरातील तसेच गावातील नागरिकांत मिसळू न देता, शाळांमध्ये निर्माण केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्याची दक्षता घ्यायची आहे. आरोग्य यंत्रणेला माहिती द्यायची आहे. गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी हे या नियंत्रण समितीवर सनियंत्रक म्हणून नियुक्त केले आहेत. आदेशाचे पालन न करणारे कारवाईस पात्र राहतील, असा उल्लेख सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आदेशात केला आहे.
ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष सुरू करावा, याबाबत सरपंच, सदस्य तसेच कोविड कमिटीला ग्रुप चर्चेतून सुचवले होते. आता शासनानेच आदेश काढल्याने संसर्गाचा धोका टळणार आहे.- किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य, चिखले
याबाबतचा आदेश प्राप्त झाला असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण कक्षनिर्मितीची लवकरच अंमलबजावणी सुरू होईल.- बी. एच. भरक्षे, गटविकास अधिकारी, डहाणू