वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्रातील श्वानांच्या मृत्यूप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी केंद्राच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या केंद्रातील कर्मचारी दिवाळी सणानिमित्त रजेवर गेल्याने केंद्रातील श्वानांचा भुकेमुळे मृत्यू झाल्याचा प्राणीमित्र संघटनांचा आरोप आहे.
वसई पूर्वेतील नवघर येथील स्मशानभूमीजवळ महापालिकेचे निर्बीजीकरण केंद्र आहे. तेथे दिवाळीच्या दिवसात ५ श्वानांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. याकाळात केंद्रातील कर्मचारी सुट्टीवर गेल्याने अन्न पाण्या अभावी ५ श्वानांचा मृत्यू झाला आहे, असा धक्कादायक आरोप अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाच्या सदस्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्र ार दिली होती. माणिकपूर पोलिसांनी उत्कर्ष स्टार मित्र मंडळ यां संचालकां विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कलमाच्या अधिनियम १९६० चे कम ११(१) एच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आमच्याकडे प्राणीमित्र संघटनेच्या सदस्यांनी तक्र ार केली होती. आम्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवून पंचनामा केला होता. मृत श्वानांचे शवविच्छेदन करण्यात आले आह. हलगर्जीपणामुळे श्वानांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे माणिकूपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर बांदेकर यांनी सांगितले. या केंद्रात १२१ पिंजरे असून दररोज १५ ते२० श्वानांचे येथे निर्बिजीकरण केले जाते.