लाेकमत न्यूज नेटवर्क, सफाळे: ‘शासन आपल्या दारी’ या महाराष्ट्र शासनाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालघर येथील कोळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन दिवस पुरती झोप उडाली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत व गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सरकारी कार्यालये उघडण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या गावांतील ग्रामसेवक व तलाठींवर प्रत्येकी ५० लाभार्थींना आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे दररोज ११ ते १२ वाजण्याच्या सुमारा म्हणजेच उशिरा येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजताच कार्यालय उघडले होते. शाळा सुरू झाल्याने शाळेला लागणाऱ्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या दारात हेलपाटे मारावे लागत; मात्र गुरुवारी सकाळी आठ वाजता सफाळे मंडळ कार्यालय उघडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शाळेची फेरी रद्द, दौऱ्यासाठी व्यवस्था
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी नागरिकांना ने-आण करण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. सफाळे एसटी आगारातील पाच बस सोडण्यात आल्या होत्या. गुरुवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेची फेरी रद्द करून मुख्यमंत्री यांच्या पालघर दौऱ्यावर बस सोडण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक बस पालघर कोळगाव येथे कार्यक्रमासाठी जाताना दिसत होत्या; मात्र पहिल्या दिवशी काही ठिकाणी बस न आल्याने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण पडले.