- शशी करपे ।वसई : आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरु झालेला जुना वरसोवा पूलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टींग केली जाणार आहे. पूल सहा तासापर्यंत बंद ठेवण्यात येणार असून चार महिन्यांपासून सुरु करण्यात आलेल्या पूलाची क्षमता तपासली जाणार आहे.मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ४८.५ मीटर लांबीच्या जुन्या वरसोवा पूलाला ४३ वर्षे उलटून गेली आहेत. २०१४ साली पूलाच्या एका गर्डरला तडा गेल्यापासून या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यावेळी नवीन गर्डर बसवण्याच्या कामासाठी तब्बल सहा महिने लागले होते. तेव्हापासून पूल कमकुवत असल्याने दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार बंद करण्यात येत आहे. गर्डर बदल्यानंतर पूल पुन्हा नादुरुस्ती झाल्याने १६ सप्टेंबर २०१६ ते १८ मे २०१७ पर्यंत पूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. याकाळात नव्या पूलावरून एकेरी वाहतूकीची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होऊ़न वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागून वाहनचालकांना अडकून पडावे लागत होते. या पूलाची दुरुस्ती लवकर करून वाहनांसाठी खुला करण्यात यावा यामागणीसाठी विविध पक्षांना रास्ता रोको आंदोलनेही केली होती.१९ मेपासून हा पूल वाहतूकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आला आहे. मात्र, आता याच पूलावरून हलक्या आणि जड वाहनांसाठी वेगवेगळ््या रांगा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा पूल जड वाहनांच्या वाहतूकीसाठी कितपत टिकेल असाच प्रश्न उपस्थित केला जात होता. नेमका आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुन्या पूलाची वेट टेस्टींग घेण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या १९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून टेस्टींग सुरु करण्यात येणार आहे. ही चाचणी सहा तास चालणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक सकाळी ८ वाजल्यापासून चाचणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.जुन्या पूल अवजड वाहनांसाठी कितपत योग्य आहे, याबाबची क्षमता या चाचणीद्वारे तपासण्यात येणार आहे. चार महिन्यात अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे पूल कमकुवत तर होत नाही ना याचीही खात्री या चाचणीतून केली जाणार आहे. या चाचणीत काही दोष आढळून आला तर मात्र पूलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता एका अधिकाºयाने व्यक्त केली आहे.नव्या पुलावरून वाहतूक मॅनेजमेंटजुना पूल बंद करण्यात आल्यानंतर नव्या पूलावरून दोन्ही बाजूची वाहतूक पंधरा पंधरा मिनिटांच्या फरकाने टप्याटप्याने सोडण्यात येणार आहे. पूल बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी होती. तसेच रस्ताच्या विरुद्ध दिशेने मोठया प्रमाणात हलकी आणि अवजड वाहने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. तसेच समोरासमोर वाहने येऊ़न वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या अनुभव लक्षात घेऊन महामार्ग वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वरसोवा खाडी पूल, जी. एन. मोटेल, रॉयल गार्डन, एस. पी. धाबा, लोढा धाम व चिंचोटी नाका या सात ठिकाणी नाके तयार करण्यात येणार आहेत. यावेळी ७५ पोलीस कर्मचारी, ५० बॅरीकेटस आणि २०० कोन वाहतूकीचे नियमन करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
जुन्या वरसोवा पुलाची होणार वेट टेस्टिंग; १९ सप्टेंबरला पूल वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 4:16 AM