- आशिष राणे वसई -येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड वज्रेश्वरी रस्त्यावर शिरवली गावानजीक एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नशीब बलवत्तर म्हणून वेळीच कारचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गाडी रस्त्याच्या बाजुला घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र कार ने मोठया प्रमाणावर पेट घेतल्याने ती जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली आहे.शिरवली ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी रात्री ८ च्या सुमारास शिरसाड फाट्यावरुन वज्रेश्वरी रोड मार्गे शिरवली गावानजीक हुंडाय कंपनीची कार जळत जळत चालली असताना कार चालकाने प्रसंगावधान राखीत कार बाजूला घेतली त्याचवेळी गावातील काही मंडळींनी जळत्या कारच्या बोनेटवर तिला पाणी टाकून विझविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र कार ने मोठया प्रमाणावर पेट घेतला होता.दरम्यान कडक उन्हामुळे व वातावरण ही तप्त झाल्याने गाडीचं इंजिन तापले असावे आणि त्यातून ही आग लागल्याची शक्यता आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.अर्थात या जळीत घटनेत कार चालकाचा जरी जीव वाचला असला तरी मात्र कार जळून खाक झाल्याने तिचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता वातावरणातील बदल व कडक उन्हाचे चटके पाहता प्रवासाला जाण्याअगोदर इंजिन व त्यातील कार्बोरेट र मधील पाण्याची पातळी तपासणे आवश्यक आहे अन्यथा मोठया अपघाताला तोंड द्यावे लागेल .
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट, नशीब बलवत्तर म्हणून कारचालक वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 11:21 PM