- लोकमत न्यूज नेटवर्कभोर/नसरापूर : माळेगाव (ता. भोर) येथे यंत्राद्वारे शेतात एका एकरावर तीन तासांत भाताची लागवड करण्याचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ६०० रुपये खर्च आणि दोन मजुरांची गरज लागते. कमी खर्चात अधिक भातलागवड करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी सांगितले.कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत यांत्रीकीकरणाद्वारे भोर तालुक्यात भात लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, उपसभापती लहू शेलार, मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे, मुकुंद ढावरे, भारत कांबळे, सुनील वाळुंज, नारायण पांगारकर, नथुराम गायकवाड, हरिभाऊ शेलार, संभाजी मांजरे व शेतकरी उपस्थित होते.भोर तालुक्यातील प्रमुख पिक भात असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. आत्तापर्यंत शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होता. त्याला मजूरही मिळत नव्हते आणि खर्चही अधिक प्रमाणात येत होता. वेळही जास्त लागत होता. मात्र, कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत तालुक्यात प्रथमच यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड उपसभापती लहु शेलार यांच्या माळेगाव येथील शेतात प्रथमच करण्यात आली.सुमारे एका एकराला तीन तासात भाताची लागवड झाली असून त्यासाठी दोन मजुर आणि यंत्राला तासाला दोन लिटर डिझेल असा एकूण ६०० रुपये खर्च आला आहे. यापूर्वी एक एकरावर भात लागवडीसाठी ४ हजार रूपये खर्च येत होता. तर २५ ते ३० किलो बियाणे (धांन्य) लागत होते. मात्र गादी वाफ्यावर पेरणी केल्यास फक्त १८ किलोच बियाणे लागते. शिवाय दोनच मजूर लागतात. मजुरीच्या पैशाची बचत होत असल्याने यांत्रिक पध्दतीनेच भात लागवड करावी असे आवाहन शेलार यांनी केले आहे.इंधन खर्चावर यंत्र कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून हातवे खुर्द येथील शेतकरी नितीन रसाळ यांनी ५० टक्के अनुदानावर भात लागवडीचे यंत्र खरेदी केले आहे. या वर्षी भात लागवडीसाठी इंधन खर्चावरच शेतकऱ्यांना हे यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी खूष आहेत.तालुक्यातील माळेगाव येथे यांत्रिक भात लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला असून तांभाड, हातवे, आळंदे व नाटंबी येथेही भात लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीऐवजी यांत्रिक पद्धतीचा वापर करून शेती केल्यास बियाणे कमी लागत असून वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी
तीन तासांत एक एकर भातलागवड
By admin | Published: July 09, 2017 1:08 AM