पारोळ : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी नियमांत राहून गणरायाचा उत्सव वसई तालुक्यात अगदीच साधेपणाने साजरा होताना दिसत आहे. दरम्यान, दीड दिवसांच्या बाप्पांना रविवारी वसई तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. तालुक्यात एकूण ११ हजार ४०६ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
कोरोनाचे विघ्न असल्याने वसईत कोठेही मिरवणुकांना, वाजंत्र्यांना परवानगी नव्हती. त्यामुळे अगदी कमी मंडळींकडून दीड दिवसांच्या बाप्पांना गणेशघाटापर्यंत आणले जात होते. ठिकठिकाणी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्थेला धक्का लागू नये म्हणून पोलीस, वाहतूक विभागाचे कर्मचारी दक्ष होते.दरम्यान, महापालिकेकडून ३० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर बहुजन विकास आघाडीकडून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ७२ ठिकाणी फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा वसई तालुक्यात वसई-विरार महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण परिसरात बाप्पांच्या संख्येत कमालीची घट झालेली पाहायला मिळाली.
बऱ्याच मंडळींनी कोरोनामुळे नातलगांना, गावकऱ्यांना आमंत्रण न देता घरच्या मंडळींच्याच सहभागात बाप्पांचा उत्सव साजरा केला. रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांना भाविकांनी महापालिकेच्या आदेशाचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गणरायांच्या इतिहासात पहिल्यांदा बाप्पांचा उत्सव अगदीच साधेपणाने साजरा झाला.
पालिकेच्या आदेशानुसार रात्री ८ पर्यंतच तलावांत भक्तांनी बाप्पांचे विसर्जन केले. वसई तालुक्यात एकूण ११ हजार ४०६ दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये २०४ सार्वजनिक गणपती तर ११ हजार २०२ घरगुती गणपती होते. मोठमोठ्या मिरवणुका तसेच जल्लोष या वेळी पाहायला मिळाला नाही. त्यामुळे भाविकांची मोठी निराशा झाली. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होवो, जगाचे कल्याण कर, अशी प्रार्थना श्री गणरायांकडे या वेळी भाविकांकडून करण्यात आली.वसई-विरारमधील सर्व पोलीस ठाण्यांतील गणेशोत्सव रद्दकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. वसईत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ७३६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी १८१ गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला आहे. तसेच वसई तालुक्यातील ७ पोलीस ठाणे, ३ डीवायएसपी व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील गणेशोत्सव रद्द करण्यात आला आहे. या रद्द गणेशोत्सवातील जमा झालेला एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली आहे.