बोर्डी : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. (एईएमएल) या वीज वितरण कंपनीने डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पाजवळील आदिवासी युवकांच्या गटाकडून एक लाख मास्क तयार करून घेतले. त्यानंतर या मास्कचे वाटप कंपनीने गोराई येथील झामझड पाडा, बोरिवली राष्ट्रीय उद्यान येथील चुन्नापाडा, राष्ट्रीय उद्यान तसेच गोरेगावच्या आरे कॉलनीतील झोपडपट्टी व आदिवासी पाड्यांवर मोफत वाटप केले.
यावेळी सामाजिक अंतर व प्राथमिक स्वच्छतेबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. हा उपक्रम आरोग्याबाबत जागृती आणि रोजगार निर्मितीच्या दुहेरी हेतूने अदानी ग्रुपने राबविल्याची माहिती प्रसिद्धीपत्राद्वारे दिली. शहरात रक्ताची तूट बघता एईएमएलच्या कार्यालयांमध्ये अदानी फाऊंडेशन व राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी ६०० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. हा अदानी समूहाचा वैविध्यपूर्ण भाग असून ही ऊर्जा निर्मिती, पारेषण व किरकोळ वीज वितरण, अशा एकात्मिक उद्योगात कार्यरत आहे. या कंपनीचा डहाणू येथे वीज निर्मिती प्रकल्प आहे. त्या प्रकल्पांतर्गत असलेल्या शिवणकाम संस्थेतून नजीकच्या गावातील आदिवासी युवकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कोविड संसर्गाच्या काळात त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना एक लाख मास्क शिवण्याचे काम दिले.