बोर्डी : राष्ट्रीय उत्सव हे प्रभातफेरी, संचलन आणि झेंड्याला सलामी देऊन साजरे केले जातात. मात्र कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता, शनिवार, दि. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहता येणार नसल्याचा आदेश शासनाच्या शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना ७४वा स्वातंत्र्य दिन सोहळा शाळेत सामूहिकरीत्या साजरा करता येणार नाही.भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन सोहळा यंदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना साजरा केला जाणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता, राज्याच्या शिक्षण विभागाने हा आदेश शाळांना दिला आहे. त्यानुसार सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या आणि प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय इ. मुख्याध्यापकांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तालुक्यातील ५६० शाळांमध्ये केवळ शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सकाळी ८:३५ पूर्वी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल. या वेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करताना, सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. तर विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार नसल्याचे नमूद केले आहे. शिवाय गर्दी होणार नाही याकडे आयोजकांना विशेष दक्षता घ्यावी लागणार असल्याचे नमूद केले आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आदी राष्ट्रीय सण साजरे करताना शाळेतील विद्यार्थी परिसरात प्रभात फेरी काढून देश, स्वातंत्र्य सेनानी, सैनिक इ. नावांच्या घोषणा देतात, तर देशभक्तीपर गाणी म्हणतात. त्यानंतर मैदानावरील ध्वजस्तंभासमोर उभे राहून ध्वजाला सलामी देऊन संचलन करतात.जयघोष दुमदुमणार नाहीया स्वातंत्र्य दिनी मात्र विद्यार्थी प्रभातफेरी, संचलन आणि ध्वज सलामी देण्यापासून वंचित राहणार असून प्रभातफेरीतून गावागावात ‘बलसागर भारताचा जयघोष’ही दुमदुमणार नाही.
डहाणूतील एक लाख विद्यार्थी ध्वज सलामीपासून वंचित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 1:57 AM