- आशिष राणे
वसई: वसईत मागील महिन्यात ग्रामीण भागांतील कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी आता वसई महसूल विभागाने ही मदतीचा हात पुढे केला आहे.
वाढते कोरोना संक्रमण व अपुरी पडणारी रुग्णालये व खास करून ऑक्सिजन बेड व अन्य सोयी सुविधा यासाठी कमी पडणारा निधी पाहता वसई प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे यांनी आपल्या वसई महसूल विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या तर्फे सहा जणांचे एक महिन्याचे मुळ वेतन मदत निधी म्हणून नुकतेच तालुका आरोग्य अधिकारी वसई यांना सुपूर्द केल्याची माहिती वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमत ला दिली.
दरम्यान याबाबत माहिती देताना तहसीलदार भगत यांनी स्पष्ट केलं की,वसई शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने वसईतील संत गोंसलो गर्सिया महाविद्यालय येथे 120 बेडचे कोविड केअर सेंटर दि.12 एप्रिल रोजी सुरू केलं यामध्ये 100 बेड जनरल व पैकी 20 बेड हे ऑक्सिजन बेड म्हणून राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज जास्त भासत असल्याचं लक्षात घेता याठिकाणी मिनी ऑक्सिजन प्लांट उभारून पाईपलाईन द्वारे रुग्णांना ऑक्सिजन बेड व अन्य सोयी सुविधा पुरवण्यासाठी काम ही सुरू असल्याचं सांगितले.
काही खारीचा वाटा म्हणून वसईच्या महसूल विभागाने तालूका आरोग्य अधिकाऱ्यांना या कोविड केअर सेंटरसाठी वसई प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे,वसई तहसीलदार उज्वला भगत,निवासी नायब तहसीलदार उमाजी हेळकर ,निवासी नायब तहसीलदार (महसूल) प्रदीप मुकणे, नायब तहसीलदार दिपक गायकवाड आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशन कापसे अशा सहा जणांनी आपले एक महिन्याचे मूळ वेतन (ज्याची साधारण रक्कम चार लाख रुपये होते) या कोविड केअर सेंटर मधील ऑक्सिजन बेड व पाईपलाईन साठी होणाऱ्या तसेच इतर सुविधांसाठी देत असल्याचे मदतपत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यास दिलं आहे.महसूल विभागाने दिलेल्या या एक महिन्याच्या वेतन मदत निधिचे वसईतील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.