नालासोपारा (मंगेश कराळे) :- सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चेतन सिंह या आरपीएफ जवानाने गोळीबार केला. या घटनेत तीन प्रवासी व एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले. या गोळीबारात मरण पावलेल्या प्रवाशापैकी एक जण नालासोपारा शहरातील आहे. अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरावाला (५०) असे त्यांचे नाव असून ते राहत असलेल्या परिसरात व इमारतीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नालासोपाऱ्याच्या आचोळे रोडवरील तेज प्रतिभा सासोयटीतील ए विंगच्या ४०२ नंबरच्या सदनिकेत राहत होते. ते बोरी समाजातील असल्यामुळे मोहरमनिमित्त मुळगावी भानपुर येथे गेले होते. त्यांना मुलगा हुसेन आणि मुलगी जैनत असे दोन मुले आहेत. हुसेन हा दुबई येथे कामानिमित्त असुन त्यांची पत्नी देखील सध्या मुलांसोबत दुबई येथे आहे. तर मुलगी जैनत हिचे लग्न झाले असून ती अहमदाबादला राहते. त्यांचा मुलगा हुसेन हा दुबई वरून निघाला असल्याचेही कळते.
अब्दुल भानपुरावाला यांचे गालानगर येथे डायपर विक्रीचे दुकान आहे. पुढच्या आठवड्यात ते दुबईला पत्नी व मुलांकडे राहण्यासाठी जाणार होते. मात्र सोमवारी झालेल्या भ्याड गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. भानपुरवाला हे राहत असलेल्या सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व मदत करण्यात सदैव तत्पर असल्यामुळे बोरी समाजामध्ये समाजपयोगी उपक्रमात सतत सहभागी होत असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.