वाडा : १८ ते ४४ या वयोगटातील तरुण ऑनलाइन पद्धतीने लसीकरण सुविधांचा लाभ घेत असल्याने भिवंडी, वसई, ठाणे, मुंबई व गुजरातच्या काही भागातील तरुण येथे येऊन लसीकरण करून घेत असल्याने स्थानिक लोकांना लस न घेताच घरी परतावे लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.वाडा, कुडुस, कंचाड येथे शनिवारपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सुरू केली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याने तालुक्याबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. परिणामी स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहतात. यामुळे स्थानिक व बाहेरील वाद निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांनाही भांडण आवरणे मुश्कील झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवले व बाहेरच्या लोकांना परत पाठवले.कंचाड केंद्रात १०० पैकी स्थानिक फक्त ३ लोकांना लाभ मिळाला. यामुळेच लोक चिडले. हे प्रकार जास्त प्रमाणात झाले. आता स्थिती चांगली आहे. बाहेरून येणाऱ्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामुळे स्थानिकांना संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळा कुडूस हे लसीकरण केंद्र लोकवस्तीच्या ठिकाणी असल्याने तेथे लसीकरणासाठी नागरिक खूप गर्दी करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे केंद्र लोकवस्तीपासून दूर घेण्याची मागणी येथील ग्रामस्थ रिदवान पटेल यांनी केली आहे.
वाडा शहरातील रहिवाशांनी योग्य सहकार्य केल्याने या केंद्रावरील लसीकरण सुरळीत सुरू आहे .मात्र कुडूस आणि कंचाड केंद्रावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने व स्थानिक नागरिक सहकार्य करत नसल्याने ही दोन केंद्रे बंद करण्यात आली आहेत.- संजय बुरपुले, तालुका आरोग्य अधिकारी