पंकज राऊत, बोईसरजे मैदान वाचविण्यासाठी बोईसरकरांनी चार वर्षांपूवी बंद पाळून रान उठविले होते, त्या मैदानाची विक्री अंतिम टप्प्यात असून येत्या १४ दिवसांत ते रामदेव सिंथेटिक्स या उद्योगाच्या मालकीचे होणार आहे. या निर्णयाविरोधात गावकरी व सर्व पक्ष संघटना शुक्रवारी बैठक घेणार असून आंदोलनाची पुढची दिशा ठरविली जाणार आहे.५१ हजार ३१९ चौरस मीटरच्या या भूखंडाच्या विक्रीचा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. मात्र, गावकऱ्यांनी बोईसरमध्ये बंद पाळून त्याला विरोध केला होता. मात्र, तरी डीसी. टेक्स डेकोर एक्सपोर्ट या उद्योगाला त्यातील १३ हजार ६८० चौरस मीटरच्या प्लॉटची विक्री झाली होती. पुढे त्याच उद्योगाला २० हजार ६३९ चौरस मीटरचा प्लॉट विकण्यात आला. आता उरलेला १७ हजार चौरस मीटरचा प्लॉट एमआयडीसीने रामदेव सिंथेटिक्स या उद्योगाला चार कोटी ८४ लाख ५० हजारांना विकण्याचा करार केला असून त्यापैकी एक कोटी १० लाख ११ हजार ७५० ही रक्कम एमआयडीसीला अदा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम तीस दिवसांत भरावी, असे एमआयडीसीने रामदेव सिंथेटिक्सला २० जुलै २०१५ रोजी दिलेल्या अॅलॉटमेंट पत्रात नमूद केले आहे. हे मैदान हे खेळासाठी राखीव ठेवावे, यासंदर्भात खैरापाडा ग्रामपंचायत, सिटीझन फोरम आॅफ बोईसर, खैरापाडा येथील जय बरमदेव कला क्रीडा मंडळ, खैरापाड्याचे ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे बोईसर शहराध्यक्ष वैभव संखे यांनी उद्योगमंत्री व एमआयडीसी आदी संबंधितांना या निर्णयाला विरोध करणारी निवेदने मागील महिन्यातच पाठविली आहेत.आता सगळ््यांचे लक्ष शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत काय घडते याकडे लागले आहे.
मैदान बचावसाठी फक्त १४ दिवस
By admin | Published: August 06, 2015 2:51 AM