वसई : वसईतील बिग बाजार मॉल मध्ये पाकिस्तानी उत्पादनांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मॉल बाहेर गुरुवारी सकाळी गोंधळ घातला. पाकिस्तांनी उत्पादनावर बंदी नसल्याचे पोलिसांनी सांगत जमावाला शांत केले. मात्र, मॉलच्या व्यवस्थापनाने चुकून या वस्तू आमच्याकडे विक्र ीसाठी आल्याचे सांगत त्यांची विक्र ी थांबवली आणि तणाव शांत झाला.वसई पश्चिमेच्या भाबोळा येथील बिग बाजार मॉलमध्ये पाकिस्तानी कंपनीने तयार केलेली मसाले आणि हवाबंद खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे एका ग्राहकाला आढळून आले. या उत्पादनावर पाकिस्तानी कंपनीचे नाव आणि पत्ता होता. ही बाब शिवसैनिकांना कळताच त्यांनी मॉलच्या बाहेर जमून आंदोलन सुरू केले. पाकिस्तान निषेधाच्या घोषणा देत या वस्तूंची विक्री थांबविण्याची मागणी शिवसैनिक करू लागले. परिस्थितीतणाव पाहून वसई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाकिस्तांनी वस्तू विकण्यास बंदी नसल्याचे पोलिसांनी आंदोलकांना सांगितले. त्यामुंळे पोलीस आणि आंदोलकांत बाचाबाची झाली. पोलिसांनी इंगा दाखवताच आंदोलक शांत झाले. दरम्यान, मॉल व्यवस्थापकाने चुकून पाकिस्तानी वस्तू विक्र ीसाठी आल्याचे सांगितले आणि त्वरित या वस्तूंची विक्री थांबविली.दरम्यान, पाकिस्तानी वस्तू विक्रीवर निर्बंध नाहीत. त्यामुळे आम्ही मॉल व्यवस्थापनावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.
पाकिस्तानी उत्पादनांना सेनेचा विरोध, वसईतील मॉलमध्ये बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:29 AM