पालघर : शहरात रस्त्याच्याकडेला पार्किग केलेल्या दुचाकी उचलून नेण्याची मोहीम कुठलीही आगाऊ सूचना न देता पालघर पोलीस आणि पालघर नगरपरिषदेने संयुक्तरित्या आज अचानक सुरु केल्याने नागरिकांनी त्याला विरोध दर्शविला. आमच्या वर कारवाई करताना बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्डला पोलिसांचे अभय का? असा प्रश्नही या वेळी उपस्थितांनी उपस्थित केला.पालघर जिल्ह्यातील वाहतुकीची कोंडी हा विषय अनेक वर्षापासून प्रशासनाची डोकेदुखी बनल्याने प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, एस टी चे अधिकारी, पत्रकार, नागरिक इ, च्या अनेक वेळा बैठका झाल्या होत्या. त्यातून निघालेल्या मार्गापैकी पी १, पी २ ही माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी सुरु केलेल्या स्कीम सह अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनात एकवाक्यता नसल्याने फोल ठरल्या होत्या. मात्र याचा मोठा फटका गरिबांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी ला बसला होता. परंतु शहरातील वाहतुककोंडीला काही रिक्षाधारकांची बेशिस्ती आणि नाक्यानाक्या वर बांडगुळाप्रमाणे उगवलेले रिक्षा स्टॅन्ड कारणीभूत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे.पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकलेला नाही. रस्ते अरुंद असल्याने आणि बेकायदेशीर अतिक्रमणे, रस्त्यालगतच्या इमारतींनी पार्किंगसाठी जागा सोडल्या नसल्याने त्यांची वाहने रस्त्यात पार्क केली जातात. तसेच बेकायदेशीर टपऱ्या वाढीस लागल्याने हा वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता. त्या मुळे आज पालघर पोलिस आणि नगर परिषदेने संयुक्तरित्या प्रथम हुतात्मा स्तंभा जवळील रस्त्यालगत पार्क केलेल्या मोटारसायकली उचलून नेण्याची मोहीम सुरू केली. आपल्याला या संदर्भात काहीही कल्पना नसल्याने आपली गाडी सोडून द्या अशी विनवणी अनेक लोक करीत होते. मात्र पोलिसांनी वाहने उचलण्याची कार्यवाही सुरूच ठेवली होती. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त होत होता.
दुचाकी उचलून नेण्यास विरोध
By admin | Published: September 23, 2016 2:46 AM