आशिष राणे वसई : महापालिकेच्या नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग अंतर्गत शहरी व साधारण ग्रामीण भाग असलेल्या चुळणे गाव व भाबोळा परिसरातील शेजोळच्या बाळ- गोपाळांनी गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे गावात आलेले पुराचे पाणी आणि त्यामुळे झालेले अतोनात हाल ऐकवण्यासाठी थेट महापालिकेत पोहचून मोठे नागरिक असो वा राजकारणी तर स्वत: दस्तुरखुद्द स्थानिक नगसेवकांलाही लाजवेल असा ‘दे धक्काच’ दिला आहे .गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील शाळा, घरं, समाज मंदिर मुळातच संपूर्ण गाव हा दहा ते बारा दिवस पाण्याखाली व अंधारमय होता आणि यंदा पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये याकरता त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी येथील चुळणे गावातील १७ विद्याथ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी थेट महापालिकेच्या नवघर माणिकपूरचे सहाय्यक आयुक्त गिलसन घोनसालवीस यांच्या दालनात पोहचून त्यांना त्यांच्या समस्यांचे एक निवेदन देऊ केले असल्याची माहिती थॉमस डाबरे यांनी लोकमत ला दिली आहे.
दरम्यान चूळणे येथील शिक्षिका मॉनिका कोलासो आयोजित मुलांच्या कार्यशाळेचा एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यालयाला आपल्या परिसरातील बाळ गोपांळाची मोठी समस्या कोणती व ती सोडविण्यासाठी कोणाकडे भेट देणे आवश्यक आहे. या निमित्ताने दि.२१ मे मंगळवारी या १७ बाळ -गोपाळांनी नवघर माणिकपूर शहर एच प्रभाग समिती कार्यालयाचे सहा. आयुक्त गिलसन घोन्सालविस यांची भेट घेतली व गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत यावर सविस्तर चर्चा केली. एकूणच आपल्या गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत आणि त्यांची सोडवणूक स्थानिक प्रशासन म्हणून कशा प्रकारे करते याउलट त्यात आपली जबाबदारी काय असली पाहिजे याची नेमकी माहिती मुलांनाही होणे गरजेचे असल्याचे सांगत मुलांना त्यांच्या विद्यार्थी दशेच्या काळात यांचे आकलन व जाणीव होण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होती.त्यानुसार चुळणे गावातील सामाजिक कार्यकर्ते थॉमस डाबरे व शिक्षिका लुबिना घोन्सालविस या दोघांच्या सहकार्याने ही भेट घडवून आणली होती. यावेळी झालेल्या तासाभराच्या भेटीत सर्व मुलांनी सहाय्यक आयुक्तांना चूळणे व भाबोळा परिसरात गेल्या वर्षी पुराच्या पाण्यामुळे आलेले आपले गंभीर अनुभव कथन केले.काय म्हटले आहे मुलांनी निवेदनातआम्ही पावसाचा आनंद घेऊ शकत नाही. शाळेत जाऊ शकत नाही, कारण शाळेतही पाणी साचते. व्यवस्थित खेळू , बागडू शकत नाही. कुठे जाऊ शकत नाही. तसेच प्रामुख्याने हे पाणी गटार व घाणीचे असल्याने त्यामध्ये जीव जंतू असू शकतात अणि ते आरोग्यास अपायकारक आहे. गावातील नालेसफाई, गटारे ,कचरा यांची नीट सफाई होऊन गाव स्वच्छ ठेवावा यासाठी अधिकारी म्हणून जातीने लक्ष घालावे .
वास्तविक निवेदन, चर्चा, उपाय भेटी ही सर्व कामे लोकप्रतिनिधी व मोठ्यांची, नागरिकांची मात्र यंदा प्रथमच असे चित्र महापालिकेत पाहायला मिळाले, वास्तविक आपली तरूण पिढी सरकारी दफ्तरी पाय टाकायला तयार नसते पण आज चक्क वसई विरार महापालिकेत विद्यार्थी दशेत असलेल्या या बाळगोपाळांनी महापालिका इमारतीत आनंदाने इकडे तिकडे हिंडून कामकाज समजावून घेतले आणि त्यावेळी बच्चे कंपनीला पहिल्यादांच कार्यालयात पाहून येथील कर्मचारी सुध्दा खुश तर झाल्याचे दिसले. मात्र दुसरीकडे हा क्षण सर्वानाच लाजवेल असा होता.