पालघर : पालघर मधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या लग्नासाठी राजस्थान येथे गेलेल्या वऱ्हाडींपैकी काही वऱ्हाडी कोरोनाग्रस्त (Corona Positive) झाले आहेत. यामुळे सर्व वऱ्हाडींना कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Palghar high profile People corona Positive After attending Rajsthan wedding.)
पालघर पूर्व येथे राहणाऱ्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने राजस्थान येथे होणाऱ्या आपल्या मुलाच्या लग्नासाठी काही प्रतिष्ठीत व्यक्तींना विमानाच्या प्रवासासह हॉटेल्समध्ये दोन दिवसांची राहण्याची व्यवस्था केली होती. सुमारे 190 वऱ्हाडी राजस्थानची टूर करून पालघरला परत आल्यानंतर त्यातील काही वऱ्हाडींना ताप, सर्दी, खोकल्याचा आजार झाल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार सुनील शिंदे ह्यांनी सर्व वऱ्हाडींना कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या गुजरात, राजस्थान आदी भागात लग्नसमारंभ आदी शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या पालघरवासीयांची संख्या मोठी असून अश्या वऱ्हाडींना चाप लावण्याबाबत जिल्हा प्रशासन गंभीरपणे विचार करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.