लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : सन २०१९-२० सालच्या सुमारे ११ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीपैकी अवघी चार कोटीची रक्कम वसूल करण्यात पालघर नगर परिषद प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित सात कोटींच्या रकमेची वसुली करण्यात नगर परिषदेला अपयश येत असल्याने त्यांनी आता नोटीस, जप्ती आणि वेळ पडल्यास गुन्हे दाखल करण्याची पावलेही उचलली जातील, असा कडक इशारा मुख्याधिकारी स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी दिला आहे.
पालघर नगर परिषद हद्दीमध्ये ३२ हजार ५७१ मालमत्ताधारक असून, त्यापैकी २६ हजार ८४ निवासी, ६ हजार ९१ वाणिज्य, ३६७ औद्योगिक, २७ धार्मिक, तर दोन सरकारी व्यवस्थापना आहेत. मागील अनेक वर्षांपासूनची असलेली थकबाकी आणि सन २०२०-२१ वर्षाचा असा एकूण सात कोटींहून अधिक थकबाकी वसुलीसाठी महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली एकूण चार पथके कार्यरत करण्यात आली असून, ही पथके थकबाकीधारकांचे उंबरठे झिजवत आहेत. दुसरीकडे शहरात लाउडस्पीकरवरून थकबाकीचा भरणा आणि जप्तीबाबत नागरिकांना आवाहनही केले जात आहे. थकबाकीदारांमध्ये दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या ६५० इतकी असून, ५० हजार ते १ लाखदरम्यान रुपयांची थकबाकी असलेले १४७ मालमत्ताधारक आहेत. १ लाख रुपयांहून अधिक थकबाकी असणारे ६५ मालमत्ताधारक असून, कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेकांच्या व्यवसाय व नोकरीवर गदा आल्याने मालमत्ता कर एकत्रित भरणे शक्य नसल्यास त्यांना हप्त्यांची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा देताना मालमत्ताधारकांनी दिलेले धनादेश मुदतीत न वटल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
कर देण्यास अनेकांची टाळाटाळमालमत्ताधारकाकडून मालमत्ता कराची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ करण्यात येत असेल किंवा देय रक्कम भरली जात नसेल अशांच्या विरोधात नगर परिषद अधिनियमानुसार जप्ती करण्याबाबत पूर्वसूचना, नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी सांगितले.