वसई : तालुक्यातील शहरी भागातील वसई-विरार शहर महापालिका आणि वसईच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. १३ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यानंतर १२७ दिवसांत दररोज सरासरी सुमारे ७८ रुग्ण सापडले आहेत. तर, या कालावधीत मृत्युदर १.९९ टक्के राहिला आहे.
तालुक्यात महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भाग पकडून एकूण १० हजार नऊ रुग्णांची संख्या गाठली आहे. सध्या दिवसाला २०० ते २५० रुग्ण सापडत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत नऊ हजार ५७६ आणि वसई ग्रामीण परिसरातील ४३३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील ६ हजार ५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनामुळे आतापर्यंत १० मृत्यू झाले आहेत. त्यामुळे एकूणच हा मृत्युदर या बाधित रुग्णसंख्येच्या १.९९ टक्के आहे. वसई शहरात तीन हजार २५८ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या जीवघेण्या आजारामध्ये वसई-विरारमध्ये १८९ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. ग्रामीण भागातही १० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मृत्युदर हा बाधित रुग्णसंख्येच्या १.९९ टक्के आहे.