वसई : रविवार, ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ९ व्या वसई-विरार महापौर मॅरेथॉनची तयारी आता दुसºया टप्प्यापर्यंत पूर्ण झाली आहे. पालिकेचा अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग या तयारीत गुंतला आहे. ९ व्या वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत यंदा २० हजारांहून अधिक धावपटू सहभाग नोंदवतील असे पालिकेचे म्हणणे आहे.मॅरेथॉनच्या मार्गावर एकही खड्डा राहणार नाही, याची काळजी पालिकेच्या बांधकाम विभागाने घेतली आहे. मॅरेथॉन मार्गावर डांबरीकरणाचे पॅचवर्क, पांढरे पट्टे मारून परिसर सुशोभित करण्यात येत आहे. दुभाजकांना तसेच स्पर्धा मार्गावरील झाडांना रंग देण्यात येत आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आणि इतर अधिकाऱ्यांनी स्पर्धामार्गाची तीन ते चार वेळा स्वत: पाहणी केली आहे.यंदाही या स्पर्धेत जवळपास ४० लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षीसे रक्कम देण्याचा मानस आहे. या शर्यतीत बॅटल रन हा वेगळा गट करण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळे रनिंग ग्रुप्स सहभागी होणार आहेत. ब्रँड अँबेसेडर म्हणून यावेळी कोणता खेळाडू, अभिनेता उपस्थित राहील याची माहिती अद्याप मिळाली नाही.या स्पर्धेसाठी ट्रॅफिक फ्री रु टची योजना आखण्यात आली आहे. स्पर्धेचे योग्य पद्धतीने आयोजन करण्यासाठी विविध विभागांची मदतदेखील आम्हाला मिळत आहे, असे ही आयोजकांनी सांगितले.
महापौर मॅरेथॉनची जोरदार तयारी सुरू, २० हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 1:02 AM