आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, वसई : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा ही जाणवत आहे. असे असताना राज्य सरकारकडून ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर मोठं यश आले आहे.
दि.19 एप्रिल ला सुटलेल्या पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेस नंतर मुंबई कोकण साठी गुजरात हुन महाराष्ट्रातील डहाणू पालघर आणि अखेर वसई रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास पोहोचलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस वसई रेल्वे स्थानकाहुन नवी मुंबईतील कळंबोली स्थानकात रवाना झाल्याची माहिती रेल्वेने दिली गुजरात राज्यातून रविवारी रात्री येथून प्राणवायू घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी सकाळी 11.00 वाजता वसई रेल्वे स्टेशनवर दाखल झाली.
एकूण शंभर मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन असलेले तीन टँकर घेऊन निघालेल्या या ऑक्सिजन एक्स्प्रेस गाडीतून 03 टँकर सोमवारी सकाळी 11 वाजता नवी मुंबईतील कळंबोली च्या दिशेने रवाना झाली. दरम्यान रात्री गुजरात हुन निघालेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस गाडी राज्यात येत असल्याचे रेल्वे कडून समजताच राज्यातील डहाणू पालघर विरार आणि वसईत सुरक्षितेचे मोठे उपाय करण्यात आले होते.
खबरदारी म्हणून वसई रेल्वे स्थानकात गाडी येत असल्याचे समजले असता ही गाडी रवाना होईपर्यंत या ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या सुरक्षेसाठी रेल्वे ने मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता . जेणेकरून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरक्षित वसईतुन पुढे सुखरूप कळंबोली रेल्वे स्थानकात पोहचल्यावर रेल्वे व स्थानिक प्राधिकरण आणि पोलीस बंदोबस्त ठेवून त्याठिकाणी हे तीन टॅंकर उतरवले जातील. आणि ज्या ज्या मुंबई व कोकण विभागातील रुग्णालयाना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशाना तो प्रशासनातर्फे गरजेनुसार पुरविण्यात येईल असे शासनाचे नियोजन आहे.