कासा : डहाणू तालुक्यात पावसाअभावी भात रोपण्या रखडल्या आहेत. रोपणीसाठी पाणीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती ओस टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जात असून यामध्ये गरवी, निमगरवी, हळवी भात पीक घेतली जातात. तालुक्यातील कासा, सायवन, वाणगाव, धुंदलवाडी आधी भागात पावसाअभावी शेतकºयांना आपल्या रोपण्या थांबवाव्या लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दांडी मारली आहे.
शेतकºयांनी सुरुवातीला हळव्या भातशेतीच्या रोपणीची कामे सुरू केली. मात्र, काही दिवसांनी पावसाने दांडी मारल्याने चिखलणीसाठी पाणी कमी पडू लागले. त्यामुळे शेतकºयांनी हळवी भातपीक सोडून गरवी भात लागवड सुरू केली. मात्र सतत आठवडाभर पाऊस गायब झाल्याने गरवी भात लागवडीसाठीही पाणी कमी पडू लागले. त्यामुळे काही शेतकºयांनी मोटारपंप व विहिरींवर इंजिन लावून लागवड सुरू केली, तर खेड्यापाड्यातील शेतकरी इकडून तिकडून किंवा कोणाकडून मागून इंजिन, पाईप, मोटारच्या साह्याने जिथे विहीर, नाला, एखाद्या खड्ड्यातून पाणी घेणे शक्य आहे, तिथून पाणी घेऊन रोपण्या थोड्या प्रमाणात चालू ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर जिकडे चिखलनीसाठी पाणी नेणे शक्य नाही ती शेती ओस टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी भात लागवड केली आहे, तिथे पाऊस पडत असल्याने ती शेती कोरडी पडत असून शेतात भेगा पडत आहेत. त्यामुळे खूप पाण्यासाठी खटाटोप करून लागवड केलेली पिकेही आता पावसाअभावी करपू लागली आहेत.पाऊस पडत नसल्याने आमची रोपणीची कामे थांबली आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर शेती ओस टाकावी लागेल.- सुनील घरत, शेतकरी, कासा