- दीपक मोहिते, वसईपालघर पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. एक-दोन दिवसांत आयोगातर्फे आचारसंहिता जारी केली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही जागा रिक्त होऊन ६ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यामुळे लवकरच पोटनिवडणूक जाहीर होईल, असा अंदाज आहे.पालघर पोटनिवडणूक कधी लागते, याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, सेना आणि बहुजन विकास आघाडी हे प्रमुख पक्ष या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकतील, असा अंदाज आहे. परंतु, राज्यात सेना-भाजपातील शीतयुद्धामुळे ही पोटनिवडणूक भाजपही लढवू शकतो. स्थानिक पातळीवरही भाजप-सेनेचे नाते विळ्याभोपळ्याचे आहे. त्यामुळे भाजपा या विधानसभा क्षेत्रात आपली ताकद आजमावेल, अशी शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येही गेली अनेक वर्षे धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने स्थानिक नेत्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. बहुजन विकास आघाडीनेही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरला तर काँग्रेसच्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सेनेची उमेदवारी माजी आमदारांच्या मुलाला दिल्यास सहानुभूतीचा फायदा सेनेला मिळू शकतो. पालघर काँग्रेसमधील अंतर्गत धुमश्चक्री व सेनेचे आव्हान अशा दोन आघाड्यांवर काँग्रेसच्या उमेदवाराला झुंज द्यावी लागणार आहे. अशा या लढतीमध्ये बहुजन विकास आघाडी किती मते मिळवते, यावर सेना व काँग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
कोणत्याही क्षणी पालघरची पोटनिवडणूक?
By admin | Published: October 24, 2015 12:26 AM