पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळतोय, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीकडून असा आरोप होत असतानाच दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. राजन नाईक यांच्या कार्यालयातून मतदारांना कॉल केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मतदारांना प्रलोभन दिले जात असल्याचा संवाद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भाजपाला मतदारांना प्रलोभन देण्याची आवश्यकता नाही, असे सांगत राजन नाईक यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
मतदारांना आमिष दिल्याचा आरोपअनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना आमिष दाखवत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली, अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिली. पालघर पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.