पालघरः भाजपा आणि शिवसेनेनं प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत वेगळीच लढाई पाहायला मिळतेय. बहुजन विकास आघाडीची 'शिट्टी' जोरात वाजली असून त्यांची गाडी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये सुसाट सुटलीय. त्यांचे उमेदवार बळीराम जाधव यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यापुढे आव्हान उभं केलं आहे, तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा तिसऱ्या स्थानावर आहेत.
पहिल्या फेरीत राजेंद्र गावित यांना ११ हजार २३६ मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर बळीराम जाधव होते. त्यांच्या खात्यात ११ हजार ९० मतं पडली, तर श्रीनिवास वनगा या फेरीत ८ हजार १९० मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. हाच ट्रेंड पुढच्या फेऱ्यांमध्येही कायम राहिलाय. तिसऱ्या फेरीनंतर ३३ हजार ४६४ मतं मिळवून राजेंद्र गावित ६ हजार ८५७ मतांनी आघाडीवर आहेत, तर बळीराम जाधव २६६०७ मतांसह दुसऱ्या स्थानावर.
पालघर पोटनिवडणुकीत काँग्रेसला जोर का झटका बसल्याचं चित्र आहे. तिसऱ्या फेरीनंतर त्यांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना ५ हजार ९९४ मतांपर्यंतच मजल मारता आलीय. हे चित्र यापुढच्या फेऱ्यांमध्येही कायम राहणार की बदलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पालघरमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल, अशी अपेक्षा होती. भाजपानं याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारासाठी मैदानात उतरवलं होतं. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे या दोघांमध्ये मुख्य लढत अपेक्षित होती. मात्र फार चर्चेत नसलेल्या बहुजन विकास आघाडीनं सुरुवातीच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला मागे टाकल्याचं चित्र दिसतंय.