पालघरः भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे भलत्याच प्रतिष्ठेच्या झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचं आव्हान मोडून काढत त्यांनी बाजी मारल्यानं हे यश भाजपासाठी नक्कीच मोठं आहे. या त्यांच्या विजयात, शेवटच्या क्षणी एका गोष्टीनं निर्णायक भूमिका बजावल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. ती म्हणजे, मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लीप.
पालघर पोटनिवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात 'साम-दाम-दंड-भेद'च्या क्लीपनं खळबळ उडवून दिली होती आणि जणू त्या क्लीपभोवतीच निवडणूक फिरली होती. त्या क्लीपमुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील, भाजपाला फटका बसेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अत्यंत चतुराईने देवेंद्र फडणवीस यांनी त्याच ऑडिओ क्लीपच्या आधारे वातावरण फिरवलं आणि पालघर 'जिंकून दाखवलं'.
'आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजपा काय आहे हे त्यांना लक्षात आ6लं पाहिजे... साम, दाम, दंड, भेद... ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे...', अशी वाक्यं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजात ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. २५ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांची ही ऑडिओ क्लीप ऐकवून भाजपाच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र, त्याच ऑडिओ क्लीपमधील शेवटामुळे भाजपासाठी निकालाचा शेवट गोड झाला.
'आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत ठेवली पाहिजे', असा संवाद त्या ऑडिओ क्लीपच्या शेवटी होती. वसईतील सभेत त्यांनी हा भाग ऐकवला आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अधिकच उंचावली. साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो, असं असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि ही ऑडिओ क्लीप आपण स्वतःच निवडणूक आयोगाकडे देऊ, असं नमूद करत शिवसेनेला प्रतिआव्हान दिलं. ही खेळी त्यांना फायदेशीर ठरली आणि शिवसेना नाकावर आपटली.
ही होती शिवसेनेने ऐकवलेली ऑडिओ क्लीप
>> एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे... आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?...
>> ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही...
>> आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे...
>> ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा... साम, दाम, दंड, भेद...
>> ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे...
>> तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे...