- हुसेन मेमनजव्हार - राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागात वाटप करण्यात आला असून, पालघर जिल्ह्यात हा निधी फक्त कागदावरच असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, जव्हार कृषी विभागात त्यात मोठा भ्रष्टाचार उघड झाला असून, भ्रष्टाचाराचे पैसे कृषी अधिकाऱ्याला मिळाले नसल्याने तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादाचे व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत.
जव्हार तालुक्यात कृषी विभागात एक तालुका कृषी अधिकारी, दुसरे कृषी अधिकारी तसेच मंडळ अधिकारी-१ व मंडळ अधिकारी-२ अशी पदे आहेत. त्यामध्ये कृषी अधिकाऱ्याला बायपास करून देयके अदा करण्यात आल्याने व त्याला वाटा मिळाला नसल्याने दोघा अधिकाऱ्यांमधील वाद उफाळला आहे. भ्रष्टाचाराचे पैसे दोघांमध्ये बरोबर वाटप झाले नसल्याने दोघांत कडाक्याचे भांडण होत असून, दोन्ही अधिकारी एकमेकांवर ताशेरे ओढत असल्याचा व्हिडीओ हाती आला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान महाराष्ट्रात राबविले जात असून कृषी आयुक्तांनी कृषी विभागास २०२२-२३ साठी ३७६२.५८० लाख निधी मंजूर केला आहे. २०२३-२४ साठी १६४७५.७७५ लाख निधी मंजूर करण्यात आलेला असून ३१ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.
वाटा मिळाला नसल्यामुळे बाचाबाची - जव्हारचे तालुका कृषी अधिकारी दीपक सोमवंशी यांनी स्वत: व मंडळ कृषी अधिकारी-१ जयराम आढळ व मंडळ कृषी अधिकारी-२ संजीव गोसावी यांनी ‘पेड बाय मी’ देयके सादर केल्यामुळे कार्यालयातील कृषी अधिकारी वसंत नागरे यांनी ‘पेड बाय मी’मध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांना वाटा मिळाला नाही. - त्यामुळे नागरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात तालुका कृषी अधिकाऱ्यांबरोबर बाचाबाची करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मागील दोन महिन्यांपासून रोजच सोमवंशी व नागरे यांचा तमाशा सुरू असल्याने कार्यालयात चर्चेला उधाण आले असून झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.