जव्हार : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. देशातील शेतकरी संघटना काही महिन्यांपासून शांततापूर्व आंदोलन करत आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ पुकारला हाेता. जव्हार बाजरपेठेत या निमित्त काही तास दुकाने बंद करून व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘भारत बंद’दरम्यान अन्य मागण्याही करण्यात आल्या. वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. कोरोना काळात लोकांना रोजगार नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार द्या, गावागावांतील पाणीटंचाई दूर करा, पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा, केंद्रातील शेतकारीविरोधी तीन कायदे रद्द करा, वीजबिल बिल रीडिंगनुसार घ्या, अशा मागण्या ‘भारत बंद’ आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत.
कॉ.बुधर, कॉ.विजय शिंदे, कॉ.लक्ष्मण जाधव, कॉ.अशोक काकवा, कॉ.शांताबाई जाधव, कॉ.सुरेश बुधर, गणपत केंजरा, जयराम पारधी, रामदास पागी यांच्या नेतृत्वाखाली बंद करण्यात आला. मनोर येथेही अखिल भारतीय किसान सभेचे सुनील सुर्वे यांच्या नेतृत्वात निदर्शने केली गेली.
कासा बाजारपेठ कडकडीत बंदडहाणू तालुक्यातील कासा व चारोटी बाजारपेठ शुक्रवारी कडकडीत बंद होती. कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत कासा व चारोटी बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता येथील सर्व दुकाने दिवसभर बंद होती. भाजी मंडई, कपडा मार्केट सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट होता. रिक्षाही बंद होती. बँक, दवाखान्यात येणाऱ्या परिसरातील नागरिकांची काही ठिकाणी गैरसोय झाली.
डहाणूत भारत बंदचा फारसा परिणाम नाही
शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणि कामगार विरोधी चार काळे कायदे रद्द करा, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्या, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, चार हेक्टरपर्यंतची वनजमीन खातेदाराच्या नावावर करा, वरकस, गायरान, महसूल, देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करा, अशा मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, सिटू, जनवादी महिला संघटना, डीवायएसएफ यांच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. त्याला केवळ डहाणू रोड परिसरात अल्पसा प्रतिसाद मिळाला असून इतरत्र बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. सरकारी कार्यालये, बॅंका, शाळा, सुरळीत सुरू होत्या.
शुक्रवारी बंदच्या निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ. बारक्या मांगात, कॉ. रडका कलंगडा, कॉ. चंद्रकांत घोरखना, कॉ. चंद्रकांत वरठा, कॉ. लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी लॉकडाऊनमध्ये पोलीस गरिबांना लुटत असल्याच्या घोषणा दिल्या जात होत्या, शिवाय पोलीस कामगारांवर करीत असलेल्या अन्यायाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.