पालघर : जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एकूण २५४८ कामे सुरू असून त्यावर ६०,४६१ मजुरांची उपस्थिती आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात १ एप्रिलपासून ३९,५४१ कुटुंबांतील ८०,०५० मजुरांना कामे दिली आहेत. यापैकी ३६,७३६ आदिवासी कुटुंबे असून सर्वाधिक आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. पालघर जिल्हा रोजगार उपलब्ध करून देण्यात राज्यात प्रथम स्थानी आहे.
जिल्ह्यात शेल्फवर १२,२८८ कामे उपलब्ध असून यापैकी ९,००९ कामे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध आहेत. ३,२७९ कामे यंत्रणा स्तरावर उपलब्ध आहेत. २०२०-२१ मध्ये १ एप्रिलपासून आतापर्यंत ८,२९,७२६ इतकी मनुष्यदिन निर्मिती झालेली असून यात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात मार्च २०१९ अखेर एकूण २४.६१ लक्ष इतकी मनुष्य दिवस निर्मिती झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी दिली. मनरेगा योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षात १ एप्रिलपासून आतापर्यंत १९००.०८ लक्ष इतका निधी मजुरांच्या मजुरीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे . २०१९-२० या मागील वर्षात पालघर जिल्ह्यात एकूण ६६३६.७६ लाख इतका खर्च झालेला असून त्यापैकी ५११७.६३ लाख इतकी रक्कम अकुशल मजुरीकरिता खर्च झालेली आहे.१ एप्रिलपासून केंद्र शासनाने मजुरीच्या दरामध्ये वाढ केली असून राज्यासाठी हा दर २३८ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे. मागील वर्षी हा दर २०६ इतका होता. राज्याकरिता मजुरीच्या दरात ३२ रुपये वाढ झालेली आहे. पालघर जिल्ह्यात मजुरांना मजुरी आठ दिवसांच्या आत प्रदान करण्याचे प्रमाण १०० टक्के आहे.