पालघर : नगर परिषदेने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सोयीसुविधा पासून दूर ठेवले आहे. कामगारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, असे शासनाचे धोरण असले तरी पालघर नगरपरिषद मात्र ते धोरण या सफाई कामगारांना बाबतीत पाळत नसल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेने आपल्याच सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांत साधी निवासस्थाने तर सोडाच,पण जगण्यासाठी हव्या असलेल्या मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाहीत.
नगरपरिषद हद्दीत बोईसर रस्त्यावरील गोठणपूर भागात मागील ४० वर्षांपासून नगरपरिषदेची आरोग्य कर्मचाºयांची वसाहत आहे. ग्रामपंचायत काळापासून हे सफाई कर्मचारी या सेवेत आहेत. १९९८ मध्ये नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर या कर्मचाºयाना नगरपरिषदे मध्ये सामावून घेण्यात आले. या वसाहतीत एकूण अकरा खोल्या असून यामध्ये हे कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह अत्यंत दयनीय अवस्थेत दाटीवाटीने राहत आहेत. ग्रामपंचायतीच्या काळात बांधलेल्या या वसाहतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भिंती ना तडे जाऊन त्या कोसळण्याच्या अवस्थेत उभ्या आहेत. तुटलेले दरवाजे,अस्वच्छ ,दुरावस्था झालेली स्नानगृहे, शौचालये अशा अवस्थेत हे सफाई कर्मचारी येथे राहत आहेत.
सफाई कर्मचाºयांना चांगले राहणीमान आणि सोयीसुविधा पुरविण्यास नवनिर्वाचित नगराध्यक्ष या नात्याने मी प्रयत्नशील राहील. -डॉ. उज्ज्वला काळे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या जीर्ण वसाहतीत राहत आहेत आता या वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. प्रशासनाने आम्हा कर्मचाऱ्याकडे जातीने लक्ष देऊन आमच्या समस्या सोडवाव्यात. - हसमुख सोलंकी, सफाई कर्मचारी
ही दुरवस्था बघता घरातील बारीकसारीक दुरु स्ती स्वखर्चाने पदरमोड करून करावी लागते. लोकप्रतिनिधी पाहणी करून गेले मात्र आश्वासना पलीकडे काहीच दिलेले नाही. - मधु बरिया, सफाई कर्मचारी