पालघर - जोरदार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक गेले तीन दिवस विस्कळीत होती. काल पावसाचा जोर कमी झाल्यापासून पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र अद्यापही गाड्यांना थांबा मिळत नसल्यानं तसंच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेले असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे आता प्रवाशांच्या सहनशीलतेचा भडका उडताना दिसत आहे. प्रवासी आपला संताप आंदोलनद्वारे व्यक्त करत आहेत. आज सकाळीदेखील डहाणू स्थानकात आज प्रवाशांनी रेलरोको केला.
अरावली एक्स्प्रेस डहाणूपर्यंतच सोडण्यात आल्यानं संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. अरावली एक्स्प्रेस वांद्रे स्थानकापर्यंत जाते. मात्र पाणी भरल्याचं कारण सांगत डहाणू स्थानकातूनच गाडी परतायला लागल्यानंतर प्रवासी संतापले. प्रवाशांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत रेल रोको केला. प्रवाशांची आक्रमक भूमिका पाहता अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत सोडण्याचे रेल्वे प्रशासनानं मान्य केले. दरम्यान, चर्चगेट डहाण रोडदरम्यानची रेल्वे वाहतूक सेवा पूर्वपदावर आली आहे.