पालघर - पालघर-बोईसरदरम्यान असलेल्या उमरोळी स्थानकात आज सकाळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. मंगळवारपासून (10 जुलै) उमरोळी येथे गाड्या न थांबवल्यानं संतप्त प्रवाशांना रेल रोको करत आपला राग व्यक्त केला. आज सकाळी विवेक एक्स्प्रेसला थांबा न दिल्यानं प्रवाशांनी वांद्रे-गाजीपूर एक्स्प्रेस रोखून धरली. उमरोळी स्थानकात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा दिला जात नसल्याने उमरोळीतील प्रवाशांच्या मनात आधीपासूनच राग आहे. या रागाचा आज भडका उडाला. आपला राग व्यक्त करण्यासाठी प्रवाशांनी रेल रोको केला. दरम्यान, उमरोळी येथे थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.
(भाईंदर-विरार लोकल सेवा अत्यंत संथगतीनं सुरू)
गेल्या तीन दिवसांपासून वसई-डहाणूदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच उमरोळी स्थानकात लोकल तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळत नसल्यानं अखेर आज प्रवाशांच्या सहनशीलतेचा स्फोट झाला.