पालघर - राज्यात मोसमी पावसाच्या मंदावलेल्या वेगाने पुन्हा वेग घेतल्याने पालघर जिल्ह्यात आज सकाळ पासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचे पाहावयास मिळाले. 12 जूनपर्यंत जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
9 जून ते 12 जून या कालावधीत पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून अलर्ट जारी करताना सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून नद्यांना येणारा पूर किंवा समुद्राला येणाऱ्या भरतीच्या काळात अधिक पाऊस झाल्यास काही भाग जलमय होण्याची शक्यता आहे तर काही भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश जारी केले आहेत.